विदर्भात भाजपचा बडा नेता अजित पवारांच्या गळाला; तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भाजपच्या माजी आमदारामुळे बंडखोरीचा इशारा
भंडाऱ्यात महाविकास आघाडीची उमेदवारी चरण वाघमारे यांना मिळणार असल्याची चर्चा सुरू असल्यानं चरण वाघमारे यांच्या उमेदवारीला मविआत विरोध दर्शविताना तुमसरात कार्यकर्त्यांनी निर्धार मेळावा घेतला आहे.
Maharashtra Assembly Election 2024 भंडारा : महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) जागा वाटपाचा गुंता अद्याप सुटलेला नाही. अशातच तुमसरच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत आहे. भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे (Charan Waghmare) यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Sharad Pawar NCP) प्रवेश केल्यानं त्यांनाचं उमेदवारी मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळं महाविकास आघाडीच्या तुमसरच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड घोष व्यक्त होत आहे. भंडाऱ्यात महाविकास आघाडीची उमेदवारी चरण वाघमारे यांना मिळणार असल्याची चर्चा सुरू असल्यानं चरण वाघमारे यांच्या उमेदवारीला महाविकास आघाडी विरोध दर्शविताना भंडाऱ्याच्या तुमसरात कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा घेतला.
दोन दिवसात निर्णय घ्या, अन्यथा तुमसरात बंडखोरी अटळ
तुमसर येथील या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे माजी खासदार मधुकर कुकडे, माजी खासदार शिशुपाल पटले माजी आमदार सेवक वाघाये, माजी आमदार अनिल बावनकर यांच्यासह महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षाचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून रोष व्यक्त करताना महाविकास आघाडीच्या नेत्यांना दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला. चरण वाघमारे यांना उमेदवारी देऊ नये, अन्यथा तुमसरात महाविकास आघाडीच्या माध्यमातून पर्यायी तिसरा उमेदवार देऊन ताकद दाखवू आणि वाघमारे यांना निवडणुकीत पराभूत करू, असा इशारा देण्यात आला. उमेदवारी घोषित होण्यापूर्वीचं भंडाऱ्याच्या तुमसरात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रणसिंग फुंकल्यानं जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघालं आहे.
दरम्यान, पक्षाच्या जडणघडणमध्ये कोणतीही भूमिका नसणाऱ्या आणि आयात केलेल्या चरण वाघमारे यांना निवडणुकीत पक्षानं उमेदवारी देऊ नये, यावरून आता भंडाऱ्याच्या तुमसरात महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ज्यांनी पक्षासाठी अहोरात्र काम केलं अशाना डावलून ऐनं वेळेवर निवडणुकीच्या तोंडावर पक्षात प्रवेश करणाऱ्या वाघमारे यांना तिकीट देऊ नये, ही मागणी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी लावून धरली आहे.
विदर्भात अजित पवारांना ताकद वाढणार
माजी मंत्री राजकुमार बडोले यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झालाय. त्यामुळे राष्ट्रवादीला विदर्भात बळ मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोंदियात राष्ट्रवादीला बळ मिळणार आहे. राजकुमार बडोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. राजकुमार बडोले यांच्यासारख्या अनुभवी नेत्याचा पक्षात समावेश केल्यास पक्षाची स्थिती मजबूत होईल, असे अजित पवार म्हणाले.
हे ही वाचा