BJP Candidate List : भाजपने शिंदेंच्या शिवसेनेचे पाच मतदारसंघ खेचले, 'या' जागांवरही होणार परिणाम?
BJP Candidate List : शिवसेनेच्या पाच मतदारसंघांवर भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
BJP Candidate List : भाजपकडून (BJP) जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीमध्ये एकूण 99 जणांना संधी देण्यात आली आहे. पण यापैकी पाच मतदारसंघ हे भाजपने एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसनेकडून खेचून घेतले आहेत. धुळे शहर, अचलपूर, देवळी, नालासोपारा, उरण हे मतदारसंघ शिवसेनेचे होते. पण आता या मतदारसंघात भाजपने त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत.
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद दिल्यानंतर विधानसभा निवडणुकांसाठी तुम्ही त्याग करा, असं अमित शाह यांनी म्हटलं असल्याच्या चर्चा काही दिवसांपूर्वी सुरु होत्या. त्यातच आता शिवसेनेच्या पाच जागांवर भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता शिवनेसनेकडून कोणते मतदारसंघ लढवण्यात येतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तसेच या समीकरणाचा पालघर आणि बोईसरच्या जागांवरही परिणाम होणार असल्याचं म्हटलं जातंय.
भाजपने खेचून घेतले शिवसेनेचे 5 मतदारसंघ
धुळ्यात 2019 ला शिवसनेनेचे हिलाल माळी हे धुळे शहराचे उमेदवार होते. पण याच मतदारसंघातून भाजपकडून यंदा अनुप अग्रवाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अचलपूरमधून अतुल तायडेंना भाजपने यंदा उमेदवारी दिलीये. याच मतदारसंघातून सुनिता फिसके या शिवसनेच्या उमेदवार होत्या. देवळी मतदारसंघात भाजपकडून राजेश बकानेंना उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपचे राजन नाईक हे नालासोपाऱ्यातून उमेदवार आहेत. 2019 मध्ये या मतदारसंघातून शिवसेनेचे प्रदीप शर्मा उमेदवार होते. उरणमधून भाजपने महेश बालदींना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे मनोहर भोईर हे 2019 ला उमेदवार होते. त्यामुळे या पाच मतदारसंघावर भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे नालासोपाऱ्यात कोणाताही भाजपचा आमदार किंवा भाजपचा पाठिंबा असलेला अपक्ष आमदार निवडून आलेला नसताना या मतदारसंघात भाजपने आपला उमेदवार दिला आहे.
भाजपच्या या रणनितीचा परिणाम भविष्यातल्या जागांवरही होणार असल्याचं म्हटलं जातंय. यामध्ये पालघर, बोईसर यांसारख्या जागांचा समावेश असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे आता शिवसनेच्या या जागांवर भाजपचे उमेदवार बाजी मारणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.