Bihar Election: बिहारमध्ये राजदची सत्ता येणार, योगींच्या सरकारमधील कॅबिनेट मंत्री ओम प्रकाश राजभर यांच्या वक्तव्यानं खळबळ
Bihar Election:बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या पार पडणार आहे. योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री ओपी राजभर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या 122 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात 121 जागांवर मतदान झालं आहे. दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा काल थंडावल्या आहेत. महागठबंधन आणि एनडीए यांच्यामध्ये बिहारची सत्ता मिळवण्यासाठी कांटे की टक्कर आहे. बिहार विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधील कॅबिनेट मंत्री ओम प्रकाश राजभर यांनी निवडणुकीच्या निकालासंदर्भात मोठी भविष्यवाणी केली आहे. बिहारमध्ये एनडीए सत्तेबाहेर जात आहे. तिथं राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव याचं सरकार बनणार आहे, ओम प्रकाश राजभर म्हणाले. बिहारच्या निकालाची भविष्यवाणी करताना राजभर यांनी 60 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाल्यास राजदचं सरकार बनलं पाहिजे, असं राजभर यांनी सांगितलं.
OP Rajbhar on Bihar Election : बिहार विधानसभा निकालबाबत राजभर यांची भविष्यवाणी
ओम प्रकाश राजभर बिहारमध्ये राजदची सत्ता येणार हा दावा करताना एक गोष्ट सांगितली. ते म्हणाले की जेव्हा जास्त मतदान झालं आहे, तेव्हा बिहारमध्ये राजदचं सरकार बनलं आहे. ओवेसी राजद विरोधात लढत आहेत. प्रशांत किशोर सर्वांच्या विरोधात लढत आहेत. जनतेच्या मनात काय आहे याचा अंदाज कोनाला येत नाही. जनता शातं आणि नेते बोलत आहेत, असं ओम प्रकाश राजभर म्हणाले.
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या म्हणजेच 11 नोव्हेंबरला होणार आहे. पहिल्या टप्प्यात 64.66 टक्के मतदान झालं आहे. बिहारमध्ये किंवा लोकसभा निवडणुकीत आतापर्यंत इतकं मतदान झालं नाही. जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा ते सत्ताधाऱ्यांविरुद्ध असल्याचं मानलं जातं.
ओपी राजभर यांच्या दाव्याची पडताळणी केली असता असं दिसून आलं. जेव्हा पहिल्यांदा बिहारमध्ये लालू प्रसाद यादव 1990 मध्ये सत्तेत आले होते तेव्हा मतदानाची टक्केवारी 62.04 टक्के होती. 1995 मध्ये मतदानाची टक्केवारी 61.79 टक्के होती. त्यावेळी देखील राजद पुन्हा सत्तेत आलं होतं. 2000 मध्ये बिहारमध्ये 62.57 टक्के मतदान झालं होतं. तेव्हा देखील राजद पुन्हा सत्तेत आलं होतं.
ओम प्रकाश राजभर यांच्या सुहेलदेव भारतीय समाज पार्टीनं बिहारमध्ये 64 जागांवर निवडणूक लढवली आहे. ओमप्रकाश राजभर सातत्यानं एनडीए विरोधात वक्तव्य करत आहेत. राजभर यांनी बिहारमध्ये बंपर वोटिंगनंतर राजद सत्तेत येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. जेव्हा 60 टक्क्यांवर मतदान जातं ते व्हा महागठबंधनचं सरकार येतं, असं ओमप्रकाश राजभर म्हणाले. ओम प्रकाश राजभर आणि त्यांचा मुलगा डॉ. अरविंद राजभर यांनी बिहारमध्ये सभा घेतल्या आहेत. राजभर यांच्या पक्षाचे 34 उमेदवार दुसऱ्या टप्प्यात निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान बिहारमध्ये मतमोजणी 14 नोव्हेंबरला होणार आहे.





















