Ajit Pawar: दादाचा वादा! 23 तारखेला बारामतीकर मलाच निवडून देतील, अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास
Ajit Pawar: बारामतीचे मतदार सुज्ञ आहेत, असा माझा ठाम दावा आहे. ते त्याबद्दलचा योग्य निर्णय घेतील, असं म्हणत अजित पवारांनी एबीपी माझाच्या कार्यक्रमात विधानसभेत विजय मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. या अनुषंगाने आज एबीपी माझाच्या माझा, महाराष्ट्र, माझं व्हिजन या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हजेरी लावली. या कार्यक्रमावेळी अजित पवारांनी अनेक गोष्टींवर सविस्तर भाष्य केलं, त्याचबरोबर या विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून आपलाच विजय होईल, 23 तारखेला बारामतीकर मलाच निवडून देतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
काय म्हणाले अजित पवार?
लोकसभेनंतर किंवा आता विधासभेला जेव्हा युगेंद्र पवार आपल्या विरूध्द उभे आहेत त्यावरून कधी असं वाटतं का की, वेगळं होऊन आपण चुक केली, या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, असं काही वाटतं नाही, शेवटी सर्वांना आपापली मते मांडण्याचा, आपल्या विचारधारेने पुढे जाण्याचा अधिकार आहे, युगेंद्र पवार माझ्या विरोधात आहेत, त्यावर मला जास्त काही बोलायचं नाही. कारण लोकशाही आहे. प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे, तसा तो उमेदवार म्हणून उभा आहे. त्यांच्या पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे. बारामतीचे मतदार सुज्ञ आहेत, असा माझा ठाम दावा आहे. ते त्याबद्दलचा योग्य निर्णय घेतील.आमच्या परिने आम्ही आमची बाजू मांडू. ते त्यांच्या बाजूने मांडतील. बारामतीकरांना वाटेल त्या पध्दतीचा कौल ते देतील, असं अजित पवारांनी कार्यक्रमात बोलताना म्हटलं आहे.
काका पुतण्या एकत्र येणार का ? दादा म्हणाले मी ज्योतिष नाही
राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार का? यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, तुम्हाला वाटलं होतं का, काँग्रेस शिवसेना एकत्र येईल. राजकारणात चढ उतार येत असतात. जमिनीवर पाय ठेवून काम करायचं असते असेही अजित पवार म्हणाले. यश मिळालं तरी हुराळून जायचं नसतं, अपयश आलं तरी खचून जायंच नसतं असेही अजित पवार म्हणाले. आमचं सरकार लोकाभिमुख कारभार करत असल्याचे अजित पवार म्हणाले. आमच्या अनेक योजना लोकप्रिय झाल्याचे अजित पवार म्हमाले. लाडकी बहिण योजना असेल, शेतकरी वीज माफी योजना असेल, दुधाचे अनुदान सात रुपये केले आहे या गोष्टी आम्ही केल्या आहेत. या गोष्टी करताना जात पात धर्म समोर ठेवला नसल्याचे अजित पवार म्हणाले. याबाबत आमच्यावर पोरकटपणाचे आरोप झाल्याचे अजित पवार म्हणाले. एबीपी माझाच्या महाराष्ट्र माझा माझा व्हिजन या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.