Assembly Election Result | भाजपमध्ये गेले अन् 40 वर्षांची सत्ता गमावली!
अकोले मतदारसंघातील लोकांमुळे हा विजय पाहता आला. हा विजय रखडलेल्या विकासाचा, धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा असल्याचं दिसून येत आहे, असं विजयी उमेदवार किरण लहामटे यांनी म्हटलं.
अहमदनगर : अकोले विधानसभा मतदारसंघात पिचड पिता-पुत्राला मोठा धक्का बसला आहे. पिचडांच्या 40 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावण्याची कमाल राष्ट्रवादीने उमेदवार डॉ. किरण लहामटे यांनी करुन दाखवली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मंत्री मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र पिचड पिता-पुत्रांचा भाजप प्रवेश लोकांना आवडला नाही, असं एकूण निवडणुकीच्या निकालातून दिसून येत आहे.
राष्ट्रवादीच्या किरण लहामटे याठिकाणी 57 हजार 789 मताधिक्याने विजयी झाले. किरण लहामटे यांना 1 लाख 13 हजार 414 मतं मिळाली तर भाजपचे वैभव पिचड यांना 55 हजार 725 मते मिळाली.
मतदार संघातील लोकांनी दिलेला कौल मान्य आहे. पक्षांतराचा फटका बसला असं अजिबात वाटत नाही. आमचे जुने चिन्ह आमच्या नावावर खपवले का? हे तपासावं लागेल, अशी प्रतिक्रिया पिचड यांनी दिली. मतदार संघातील लोकांच्या भावनेचा आदर करत पुढील काळात पराभवाची कारणे शोधणार आहे. नवीन आमदारांच्या हातून चांगली कामे झाली पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त करत वैभव पिचड यांनी किरण लहामटे यांचं अभिनंदन केलं.
अकोले मतदारसंघातील लोकांमुळे हा विजय पाहता आला. हा विजय रखडलेल्या विकासाचा, धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा असल्याचं दिसून येत आहे. विजयाची पूर्ण खात्री होती पण एवढं मताधिक्य मिळेल यांचा अंदाज नव्हता. पुढील पाच वर्षात आदर्श तालुका करण्याचा आपला मानस असेल. शाळा,आरोग्य, पर्यटन, रस्ते, वीज, पिण्याच्या पाण्याच्या समस्या दूर करण्याचा आपला प्रयत्न असेल असं नवनिवर्चित आमदार किरण लहामटे यांनी म्हटलं.