ठाण्यात राष्ट्रवादी- मनसेचं ठरलं! राष्ट्रवादीचा मनसे उमेदवार अविनाश जाधवांना पाठिंबा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने ठाणे शहर मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि मनसेच्या अविनाश जाधव यांना मार्ग मोकळा करून दिला आहे. एकप्रकारे राष्ट्रवादीने मनसेच्या अविनाश जाधव यांना पाठिंबा दिला आहे.
ठाणे : लोकसभेच्या निवडणुकांनंतर ज्या आघाडीची सर्वांना शक्यता वाटत होती, ती आघाडी अखेर झाल्याचं समोर येत आहे. ही आघाडी म्हणजे राष्ट्रवादी आणि मनसेची आघाडी. ठाण्यात राष्ट्रवादीच्या उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर या आघाडीवर शिक्कामोर्तब झालं आहे.
लोकसभेच्या निवडणुकीवेळी राज ठाकरे यांनी उघडपणे भाजपला विरोध केल्यानंतर अचानक त्यांच्या आणि शरद पवार यांच्यातील जवळीक वाढू लागली होती. त्यानंतर कधी शरद पवारांच्या घरी तर कधी विमानात या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झालेली सर्वांनी पाहिली. मात्र या चर्चांचं फलित आता विधानसभेला दिसू लागलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने ठाणे शहर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि मनसेच्या अविनाश जाधव यांना मार्ग मोकळा करून दिला आहे. अशारीतीने राष्ट्रवादीने मनसेच्या अविनाश जाधव यांना पाठिंबा दिला आहे. अविनाश जाधव यांनीही राष्ट्रवादीचे पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले.
या खेळीमुळे राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते जरी नाराज असले तरी नेत्यांना मात्र यात काहीही गैर वाटत नाही. उलट यातच भविष्य असल्याचे ते सांगत आहेत. फॅसिझमच्या विरोधात आम्ही एकत्र आलो आहोत. शेवटी त्यांच्या विरोधात जास्तीत जास्त लोकांना जिंकून द्यायचे आहे, असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं. गेल्या पाच वर्षात देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आम्ही केलेल्या कामांना जनता पसंती देईल आम्हाला निवडून देईल, असा विश्वास भाजपचे उमेदवार संजय केळकर यांनी व्यक्त केला. मनसेला राष्ट्रवादीने दिलेल्या पाठिंब्यामुळे काहीही फरक पडणार नाही, असंही केळकर यांनी म्हटलं.केवळ ठाणे शहर हा एकच मतदारसंघ नाही तर कल्याण पश्चिम, नाशिक, मुंबई आणि इतर काही ठिकाणी देखील मनसेच्या उमेदवारांना राष्ट्रवादीने समर्थन दिले आहे. जेणेकरून विरोधातील मतांचे विभाजन होऊ नये.