कुर्ला मतदारसंघात सुमडीत कोंबडी; राष्ट्रवादीचा एक उमेदवार शक्तीप्रदर्शनात गुंग, दुसऱ्याने स्वप्न केलं भंग
कुर्ला मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून जोत्स्ना जाधव आणि मिलिंद कांबळे हे दोन उमेदवार इच्छुक होते. मात्र राष्ट्रवादीकडून मिलिंद कांबळे यांनी बाजी मारली आहे.
मुंबई : कुर्ला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराने राष्ट्रवादीच्याच उमेदवाराला धक्का दिला आहे. उमेदवारी अर्जावरुन मोठा ड्रामा याठिकाणी पाहायला मिळाला. हाजिर तो वजीर, यानुसार कुर्ला मतदारसंघात राष्ट्रवादीकडून मिलिंद कांबळे यांनी बाजी मारली आहे.
कुर्ला मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून जोत्स्ना जाधव आणि मिलिंद कांबळे हे दोन उमेदवार इच्छुक होते. पक्षाने दोघांनाही एबी फॉर्म दिले होते. जोत्स्ना जाधव यांनी मोठा गाजा-वाजा करत, शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक कार्यालयात निघाल्या. त्यांचा हाच उत्साह त्यांना महागात पडला आहे. जोत्स्ना शक्तिप्रदर्शनात गुंग राहिल्या तर मिलिंद कांबळे यांनी सुमडीत आपला अर्ज दाखल करत बाजी मारली.
मिलिंद कांबळे यांनी जोत्सा जाधव यांच्या काही मिनिट आधी आपला अधिकृत अर्ज दाखल केला. आज अर्जाची छाननी झाली त्यावेळी मिलिंद कांबळे यांची राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली. तर जोत्स्ना जाधव यांचा अर्ज बाद करण्यात आला. त्यामुळे जोत्स्ना जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा मोठा हिरमोड झाला.
जोत्स्ना जाधव यांनी या सर्वावर काहीही प्रतिक्रिया देणे टाळलं. तर माझा पक्षश्रेष्ठींवर विश्वास होता आणि सर्व नियमाप्रमाणे झालं असल्याची प्रतिक्रिया मिलिंद कांबळे यांनी दिली आहे.
VIDEO | Sharad Pawar | नाराजी विसरुन प्रचाराच्या कामाला लागा : शरद पवार