बुलेट ट्रेनसह मेट्रो आणि नाणार प्रकल्पाला विरोध, बेरोजगारी लादू इच्छिणाऱ्या ठाकरे बंधूंना घरी बसवा, आशिष शेलारांचा घणाघात
दोन्ही ठाकरे बंधू गुंतवणूक विरोधी आहेत. रोजगार निर्मितीच्या विरोधात आहेत, अशी टीका भाजपचे नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी केली.
Ashish Shelar : दोन्ही ठाकरे बंधू गुंतवणूक विरोधी आहेत. रोजगार निर्मितीच्या विरोधात आहेत, अशी टीका भाजपचे नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी केली. बुलेट ट्रेनला दोघांचाही विरोध म्हणजे 90 हजार रोजगारांना विरोध आहे. नाणार प्रकल्पाला विरोध म्हणजे जवळपास दीड लाख रोजगाराला विरोध असल्याची टीका आशिष शेलार यांनी केली. मुंबई मेट्रो प्रकल्पाला उद्धव ठाकरेंनी स्थगिती दिली होती. या प्रकल्पाला दोन्ही ठाकरेंचा विरोध होता. वाढवण बंदराला दोघांचाही विरोध असल्याचे शेलार म्हणाले.
ठाकरेंची भूमिका ही उद्योजक विरोधी, युवक विरोधी आणि कामगार विरोधी
बेरोजगारी लादू इच्छितात त्या ठाकरेंना घरी बसवण्याची ही निवडणूक असल्याची टीका शेलारांनी केली. इथे गुंतवणूक आली तर त्याला पिटा. उद्योजक विरोधी, युवक विरोधी आणि कामगार विरोधी यांची भूमिका असल्याचे शेलार म्हणाले. पुरावा आम्हाला नका देऊ, संबंधित आयोगाला तर द्या. अयोग्य अनाठायी असं काही असेल तर तक्रार करा ना. नेपथ्यात एक्सपर्ट आहातच, सादरीकरण पण चांगलं करा ना. आम्ही अदानी कंपनीची वकिली करत नाही असे शेलार म्हणाले. आयसीआयसीआय बॅंकेचा नफा एक हजार कोटींनी वाढला मग काय सरकारचा हात आहे म्हणायचं का? मूळात सल्लागार कशी वाट लावू शकतात हे दिसतं असे शेलार म्हणाले.
राज ठाकरेंनी सल्लागारांपासून सावध राहावं
राज ठाकरेंनी सल्लागारांपासून सावध राहावं असे शेलार म्हणाले. त्या आधारे बोललं की कशी अडचण निर्माण होते. आता त्यांना स्पष्टीकरण द्यायला लागत आहे की मी अदानी समूहाचा वकील नाही. शरद पवार यांनी अदानींना हात दिला त्यांना का नाही प्रश्न विचारत? असा सवाल शेलारांनी केला. मात्र आमच्यावर दोषारोपण करणार असाल तर मला उत्तर द्यावं लागेल असे शेलार म्हणाले. 37 वर्षांपासून अदानी काम करत आहेत. मग 10 वर्ष आणली कुठून? असा सवाल शेलारांनी राज ठाकरेंना केला. वेठीस धरु नये, मुद्दा बरोबर पण जागा चुकीची आहे. देशात स्पर्धा आयोग आहे, त्यांचे कामच हे आहे की व्यावसायिक मोनोपॉली होऊ नये म्हणून तक्रार करता येते, त्यांनी तक्रार केली आहे का? न्यायालयासमोर जामीन अर्ज केल्यावर जामीन मिळतो असे शेलार म्हणाले. एखादा प्रकल्प प्रोजेक्ट प्रकल्प कायदेशीर प्रक्रियेत जपून होत असेल किंवा नसेल तर आयोगात तक्रार करा ना असेही ते म्हणाले.





















