Satara : आमदारकीच्या आधी पाकिटमारी केली, आमदार झाल्यानंतर कोविडमुळे मेलेली 200 माणसं जिवंत करून मलई खाल्ली; अनिल देसाईंचा जयकुमार गोरेंवर हल्लाबोल
Man Assembly Constituency : कोविडमध्ये मेलेली 200 लोकं जिवंत करण्याचं पाप या माणसाने केलं. एकेरी बोलायचं आणि संस्कृतीचा ऱ्हास केला असा आरोपही अनिल देसाई यांनी केला.
सातारा : जयकुमार गोरे गेली 15 वर्षे आमदार असले तरी सुधारण्याचं नाव काही घेत नाहीत. त्यांनी कोविड काळात 200 माणसं जिवंत करण्याचं पाप केलं आणि मलई खाल्ली असा आरोप सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी केला. माण-खटावच्या लोकांनी आता प्रभाकर घार्गे यांना निवडून द्यायचं ठरवलं असल्याचंही ते म्हणाले. शरद पवारांच्या उपस्थितीत प्रभाकर घार्गे यांच्या प्रचारासाठी माणमध्ये सभा झाली. त्यावेळी अनिल देसाईंनी जयकुमार गोऱ्हेंचा समाचार घेतला.
आमदारकीच्या आधी पाकिटमारी केली
भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर टीका करताना अनिल देसाई म्हणाले की, "गोरे हे 15 वर्षे आमदार झाले पण त्यांचा गुण काही सोडायला ते तयार नाहीत. आमदार व्हायच्या आधी ते पाकीटमारी करायचे. खोट्या नोटा छापायचे. हत्यारांची विक्री करायचे. सांगलीत यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. एकदा आमदार झाल्यावर त्यांचे हे गुण सुटतील असं आम्हाला वाटलं होतं.पण तसं झालं नाही. आमदार झाल्यानंतरही सांगलीतील भिसे नावाचा व्यक्ती जो सात वर्षांपूर्वी मेला होता. त्याला जिवंत केलं आणि त्याची जमीन आमदाराने आपल्या नावावर केली. त्यासाठी साक्षीदार त्यांचे पीए, बगलबच्चे होते."
जयकुमार गोरेंचा पराभव करा
इथला आमदार हा जातपातीवरून राजकारण करतोय. माणूस माणचा आहे की खटावचा आहे यावरून भेद करतोय. त्यामुळे जयकुमार गोरेंचा पराभव करा असं आवाहन अनिल देसाई यांनी केलं. डुकराला मोठं पद दिलं, खायला वरण भात आणि खीर जरी दिली तरी नंतर ते चिखलात जाऊन लोळणार असं म्हणत अनिल देसाईंनी जयकुमार गोरेंचा चांगलाच समाचार घेतला.
शरद पवार हे माणसांचे चेहरे वाचतात. त्यामुळे आता माण खटावच्या लोकांच्या चेहऱ्यावर दिसतंय की प्रभाकर घार्गे हे बहुमताने निवडून येतील असा विश्वास यावेळी अनिल देसाई यांनी व्यक्त केला.
2019 ला जयकुमार गोरेंचा निसटता विजय
माण विधानसभा मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीवेळी तिरंगी लढत झाली. भाजपकडून जयकुमार गोरे, शिवसेनेकडून शेखर गोरे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रभाकर देशमुख उमेदवार होते. माण मतदारसंघातील या निवडणुकीत जयुकमार गोरे यांना 91469 मतं मिळाली. प्रभाकर देशमुख यांना 88426 मतं मिळाली. तर, शेखर गोरे यांना 37539 मतं मिळाली. जयकुमार गोरे यांना त्यावेळी तिरंगी लढतीचा फायदा झाला.
ही बातमी वाचा: