Exclusive : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ; ऋतुजा लटकेंचा राजीनामा स्वीकारण्यास 15 दिवसांपेक्षा अधिक वेळ लागणार?
Andheri East Bypoll Election 2022 : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
Andheri East Bypoll 2022 : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत (Andheri East Bypoll) ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांच्या उमेदवारीवरून शिवसेनेच्या (Shiv Sena) दोन्ही गटांत शहकाटशहाचं राजकारण सुरु आहे. त्यांचा राजीनामा स्वीकारण्यास आणखी 15 दिवसांपेक्षा अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे. एबीपी माझाला ही एक्स्क्लुझिव्ह (ABP Majha Exclusive) माहिती मिळाली आहे. राजीनामा स्वीकारण्यास तांत्रिक अडचण असल्यानं लटके यांच्या उमेदवारीबाबत ठाकरे गटासमोर (Uddhav Thackeray) पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे दोन दिवस शिल्ल्क असताना राजीनामा स्वीकारला गेला नसल्यानं लटकेंची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता आहे.
ठाकरे गट (शिवसेना : उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्याकडून अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी रिंगणात उतरलेल्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरुन ठाकेरंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या महानगरपालिकेत काम करतात. त्यांनी साधारणतः एक महिन्यापूर्वी राजीनामा दिला होता. परंतु, तो राजीनामा अटीत बसत नसल्याची सबब देत महापालिकेकजून नामंजूर करण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी ऋतुजा लटेक यांच्याकडून दुसरा राजीनामा सादर करण्यात आला. सध्या मुंबई महापालिका शुक्रवारी सादर झालेल्या लटकेंच्या दुसऱ्या राजिनाम्यावर कार्यवाही करत आहे. पण, अद्याप 6 विभागांचं नाहरकत प्रमाणपत्र राजिनाम्याकरता मिळणं प्रलंबीत आहे.
ऋतुजा लटके यांच्या पहिल्या राजीनाम्यात काय अटी होत्या?
अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ऋतुजा लटके यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर महापालिकेत कार्यरत असलेल्या ऋतुजा लटके यांनी राजीनामा अर्ज दाखल केला. पण त्यामध्ये त्यांनी काही अटी घातल्या होत्या. जर निवडणूक जिंकले तर स्वेच्छानिवृत्ती घेईन. अन्यथा निवडणूक हरल्यास सेवा सुरु ठेवण्याबाबतची अट ऋतुजा लटके यांनी आपल्या राजीनाम्याच्या अर्जात घातली होती. त्यामुळे राजीनामा अटीत बसत नसल्याची सबब देत महापालिकेनं नामंजूर केला. त्यानंतर गेल्या शुक्रवारी ऋतुजा लटकेंनी दुसरा राजीनामा अर्ज दाखल केला आहे.
पाहा व्हिडीओ : BMC ने राजीनामा स्विकारला नाही, ऋतुजा लटकेंच्या उमेदवारीचा पेच वाढला
मिळालेल्या माहितीनुसार, शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांचा स्वेच्छानिवृत्ती राजीनामा मंजूर होण्याची प्रक्रीया तब्बल 6 महिन्यांपर्यंत चालते. ऋजुता लटके यांचा राजीनामा लवकरात लवकर मंजूर करण्याचं शासनानं ठरवलं तरी केवळ दोन दिवसांत ही प्रक्रीया पार पाडणं आव्हानात्मक आहे.
दरम्यान, शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांचं काही दिवसांपूर्वी दुबईत हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. त्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी आता पोटनिवडणूक घेतली जाणार असून निवडणूक आयोगानं कार्यक्रमही जाहीर केला आहे. शिवसेनेतील बंडानंतर ही पहिलीच निवडणूक असल्यानं ठाकरे गट आणि शिंदे गट दोघांसाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :