नरेश अरोरांनी अजितदादांच्या खांद्यावर हात ठेवल्यानं मिटकरी संतापले, पक्षाला दिला घरचा आहेर, नेमकं घडलंय काय?
Amol Mitkari Vs Naresh Arora : नरेश अरोरा यांनी अजित पवारांच्या (Ajit Pawar) खांद्यावर हात टाकून फोटो पोस्ट केल्यानंतर हीच बाब अमोल मिटकरी यांना खटकली त्यानंतर त्यांनी पोस्ट लिहून आपली भावना व्यक्त केली.
मुंबई: नुकत्याच राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या. यामध्ये महायुतीने मोठ्या प्रमाणावर विजय मिळवला. त्यानंतर या विजयावरून आणि श्रेयामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्या एक्स पोस्ट (पुर्वीचे ट्विटर) वॉर होत असल्याचं दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभा निवडणुकीत भरघोस यश प्राप्त केल्यानंतर राज्यभरातील नेते पदाधिकारी अजित पवार (Ajit Pawar) यांचं अभिनंदन करण्यासाठी देवगिरी निवासस्थानी येत होते. यावेळी अजित पवारांच्या निवडणुकीसाठी कँपेनिंग करणारे डिझाईन बॉक्सचे प्रमुख नरेश अरोरा यांनी देखील अजित पवारांचं अभिनंदन केलं. मात्र, यावेळी त्यांनी अजित पवारांच्या (Ajit Pawar) खांद्यावर हात टाकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात नरेश अरोरा यांच्यावर टीका होऊ लागली.
नरेश अरोरा यांनी अजित पवारांच्या (Ajit Pawar) खांद्यावर हात टाकून फोटो पोस्ट केल्यानंतर हीच बाब अमोल मिटकरी यांना खटकली आणि त्यांनी विधानसभा निवडणुकीत जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश मिळालं हे कोणत्या पिआर कंपनीमुळे मिळालं नाही. तर हे केवळ अजित पवारांचे यश आहे. अशा पद्धतीचे सूचक ट्विट केलं. याच ट्विटला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने रिप्लाय करण्यात आला होता, अमोल मिटकरी यांनी केलेले ट्विट हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. यालाच आता अमोल मिटकरी यांनी रिप्लाय करत हे सुद्धा तुम्ही सांगणार का अशा पद्धतीचा खोचक टोला लगावला आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोशल मीडिया हे डिझाईन बॉक्स पक्षाच्या हातात आहे. त्यामुळे पक्षातल्या पक्षात मतमतांतर दिसून येत असल्याने चर्चेला उधाण आलं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
अजित पवारांना मिळालेल्या यशामागे नरेश आरोरांच्या पीआर कंपनीचा हात असल्याची चर्चा सुरू आहे. त्यावर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, "हे सगळं खोटं आहे. डिझाईन बॉक्स नावाची त्यांची एजन्सी, ती काही फुकट काम करायला आली नव्हती. अशा प्रकारच्या तीन एजन्सी एकनाथ शिंदेंच्या सोबत होत्या. त्या कुठे दिसल्या का? त्यांच्या पक्षाला 51 जागा मिळाल्या. त्यावेळी कोणत्या संस्थेची हिंमत झाली का शिंदेंच्या खांद्यावर हात ठेऊन फोटो काढायची? तो दादांच्या बाजूला येतो, बुके देतो आणि खांद्यावर हात ठेवतो. आता भारतातील इतर ठिकाणच्या निवडणुका आहेत. आपलं दुकान सुरू ठेवण्यासाठी या पीआर एजन्सीने स्वतःला लाँच करण्याचा प्रयत्न केला. विजयाचं श्रेय आपल्याकडे घेतलं."
"मी जबाबदारीने बोलतोय, आमच्या भावना दुखल्या त्याचं काय? पवार साहेबांच्या खांद्यावर हात ठेवायची कुणाची हिंमत झाली नाही. अजितदादा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. कोण कुठला बाहेरच्या राज्यातला माणूस येतो. त्याची पीआर कंपनी लाँच करण्यासाठी म्हणतो की हे आमचं यश आहे. मग 41 आमदार निवडून आले ते, त्यांचे कार्यकर्ते, बूथ प्रमुख, सोशल मीडिया हे काय झोपत होते का? ज्या पद्धतीने तीन पीआर एजन्सीमध्ये एकनाथ शिंदेंच्या खांद्यावर हात ठेऊन फोटो काढायची हिंमत झाली नाही त्या पद्धतीने डिझाईन बॉक्स एजन्सी प्रमोट करण्याची हिंमत त्यांनी केली कशी? याचा तीव्र शब्दात निषेध करतो. अरोराराने यशाचं श्रेय घेण्याचं काही संबंध नाही. त्याला पक्षाने शो कॉज नोटीस पाठवली पाहिजे. अरोराचा काडीमात्र संबंध नाही." त्यानंतर अमोल मिटकरींनी आपली पोस्ट देखील डिलीट केल्याचं सांगितलं, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अमोल मिटकरींच्या वक्तव्याशी संबंध नसल्याचं सांगण्यात आलं आहे.
पक्षाकडून केलेल्या पोस्टमध्ये काय म्हटलंय?
श्री @AmolMitkari22 यांचं ‘डिझाईनबॉक्स्ड’ संदर्भातील वक्तव्य ही त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी कुठलाही संबंध नाही. @DesignBoxed टीमने विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी अतिशय मोलाची भूमिका बजावली आहे आणि पुढेही बजावत राहील यात शंका नाही.
पक्षाच्या पोस्टवर अमोल मिटकरींचं उत्तर
हे पण तुम्ही आम्हाला सांगणार का..? मी जे वक्तव्य डिझाईन बॉक्स संदर्भात केलं ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची प्रत्येकाचीच भावना आहे.आमचा साधा प्रश्न आहे,अजित दादांच्या खांद्यावर हात ठेवण्याची हिंमत कशी केली? हा महाराष्ट्र आहे चंदिगड नाही. चुक कबूल करा. #सॅलरीसोल्जर