Sada Sarvankar On Amit Thackeray: मी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार, पण...; सदा सरवणकरांनी ठेवली एक अट, माहीममध्ये काय होणार?
Sada Sarvankar On Amit Thackeray: मुंबईतील माहीम विधानसभेत तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
Sada Sarvankar On Amit Thackeray मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वंच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. दिवाळी संपल्यानंतर म्हणजेच 4 नोव्हेंबरपासून प्रचाराला जोर आणखी वाढताना दिसेल.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघाची (Mahim Vidhansabha) चर्चा रंगली आहे. कारण या मतदारसंघातून मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. माहीम विधानसभेत तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. मनसेकडून अमित ठाकरे, शिवसेना शिंदे गटाकडून विद्यामान आमदार सदा सरवणकर आणि शिवेसना ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने महायुतीकडून सदा सरवणकर यांच्यावर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव होता. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदा सरवणकर यांच्यासोबत चर्चाही केली. मात्र सदा सरवणकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार दिला. तसेच अमित ठाकरेंना निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याआधी राज ठाकरेंनी चर्चा केली असती, वेगळा निर्णय घेतला असता, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर आता सदा सरवणकर यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे.
...तर मी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार- सदा सरवणकर
सदा सरवणकर यांना वारंवार निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेणार का?, असा प्रश्न माध्यमांकडून विचारला जातोय. मात्र निवडणुकीतून माघार घेण्याचा प्रश्नच नाही, असं सदा सरवणकर यांनी सांगितले. तसेच एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सदा सरवणकर म्हणाले की, एकनाथ शिंदेंनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावं, अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. मनसेने महायुतीविरोधात सगळ्याच ठिकाणी आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे महायुतीविरोधात उभे केलेले मनसेने उमेदवार मागे घ्यावे. त्यानंतर मी पक्षासाठी उमेदवारी मागे घेण्यास तयार आहे, मी पक्षासाठी त्याग करण्यास तयार आहे, असं सदा सरवणकर यांनी स्पष्ट केलं आहे.
अमित ठाकरेंच्या उमेदवारीवर राज ठाकरे काय म्हणाले?
राज ठाकरेंनी अमित ठाकरेंना उमेदवारी जाहीर करण्यापासून पाठिंबाबाबत आपली भूमिका मांडली आहे. राज ठाकरे म्हणाले की, आमच्या पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली, अमित म्हणाला, पक्षाने सांगितलं तर प्रत्येकाने लढावं, मी सुद्धा लढेन...मी अमितला म्हणालो, तू सिरियस आहेस, तो म्हणाला पक्षाने सांगितलं तर प्रत्येकाने लढावे , मी सुद्धा लढेन, असं अमित म्हणाला. मी बाळासाहेबांच्या विचाराने वाढलो. अमितने ठरवले आहे, आज उभा केलं नाही, तर उद्या निवडणुकीत उभा करावाचं लागेल, असं राज ठाकरेंनी सांगितले. तसेच अमितप्रमाणे अविनाश जाधव, संदीप देशपांडे यांच्यासह इतर उमेदवार देखील माझ्यासाठी समान आहे, त्यांच्यासाठी देखील मी प्रयत्न करणार, असं राज ठाकरे म्हणाले.