Akola: आजीचा पराभव करुन 21 वर्षाची नात बनली सरपंच, अकोल्यातील नैराटची प्रिया झाली 'सरपंच मॅडम'
Akola Gram Panchayat Election Results: नुकतंच बीए झालेल्या प्रिया सराटेला आता गावाच्या विकासाची परीक्षा द्यावी लागणार आहे.
![Akola: आजीचा पराभव करुन 21 वर्षाची नात बनली सरपंच, अकोल्यातील नैराटची प्रिया झाली 'सरपंच मॅडम' Akola Gram Panchayat Election Results 21 years old Priya Sarate new Sarpanch of Nairat Akola Akola: आजीचा पराभव करुन 21 वर्षाची नात बनली सरपंच, अकोल्यातील नैराटची प्रिया झाली 'सरपंच मॅडम'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/20/dbe87eadb167f920d608e2dadb898792167155240775293_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अकोला : जिल्ह्यातील 266 ग्रामपंचायतींचे निकाल आज लागले असून या निवडणुकीत अनेक ठिकाणी युवकांनी प्रस्थापितांचे गड उद्धवस्त केलेत. अनेक गावांचा कारभार गावकऱ्यांनी तरुणाईच्या हातात दिला. अकोला जिल्ह्यातील अनेक गावांचे कारभारी तिशीच्या आतले आहेत़. मात्र, जिल्ह्यातील सर्वात लहान वयाची सरपंच ठरली आहे अकोला तालूक्यातील नैराट ग्रामपंचायतची नवनिर्वाचित सरपंच प्रिया सराटे. प्रियाचं वय अवघं 21 वर्ष 6 महिने इतकं आहे. तिने नात्याने आपली आजी असलेल्या विजया सराटे यांचा पराभव केला आहे. नैराट ग्रामपंचायतीचं सरपंचपद यावर्षी अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव होतं. नुकतीच बी. ए. झालेल्या प्रियाला आता गावाच्या विकासाची कठीण परीक्षा द्यावी लागणार आहे.
...अन प्रिया झाली 'सरपंच मॅडम'
प्रिया रामेश्वर सराटे... वय वर्ष फक्त 21 वर्ष 6 महिने... शिक्षण, 'बीए' उत्तीर्ण... नुकतीच 'बीए'ची पदवी परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या प्रियाने आज गावगाड्यातील राजकारणाची मोठी परीक्षा 'उत्तीर्ण' केली. अन यात तिला पदवी मिळाली गावाच्या 'सरपंच' पदाची. आज झालेल्या मतमोजणीत प्रियाने नात्याने तिची आजी असलेल्या विजया सराटे यांचा 92 मतांनी पराभव केला. यासोबतच गावात झालेल्या सहा सदस्यांपैकी चार सदस्य त्यांच्या गटाचे विजयी झालेत. त्यामूळे संपुर्ण नैराट ग्रामपंचायतीवर प्रिया यांच्या गटाची स्पष्ट बहूमतासह सत्ता आली आहे. प्रिया यांना 284 मतं मिळालीत. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या विजया सराटे यांना 192 मतं मिळालीत. याआधीचा कोणताही राजकीय वारसा नसतांना प्रिया यांनी थेट सरपंचपदावर घेतलेली गरूडभरारी गावकऱ्यांसाठी कुतूहल आणि अभिमानाचा विषय आहे. प्रिया यांना राज्यशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी 'एमए'ला प्रवे घ्यायचा आहे. मात्र, त्याआधीच त्या राज्यशास्त्राचं प्रत्यक्ष शिक्षण ग्रामपंचायतीच्या कारभारातून घेणार आहेत.
गावकऱ्यांसह आई-वडील-भावानं दिलं निवडणुक लढण्याचं बळ
गावात सरपंचपदासाठीचं आरक्षण हे अनुसूचित जातीतील महिलेसाठी असल्यानं अनेकांनी प्रियाचे वडील रामेश्वर सराटे यांना मुलीला उभं करण्याची विनंती केली. रामेश्वर यांना तीन मुली आणि एक मुलगा. या सर्वात प्रिया सर्वात धाकटी. प्रियानंही आनंदानं ही जबाबदारी स्विकारण्यास होकार दर्शविला. कारण, तिच्या या नव्या जबाबदारीसाठी तिच्या पंखांना विश्वासाचं बळ दिलं गावकऱ्यांसह तिच्या आई-वडिलांनी. तिची आई माया सराटे या निर्णयासह प्रचारातही तिच्यासोबत अगदी उत्साहानं सहभागी झाल्यात. आज आपली लेक गावाची प्रथम नागरिक झाल्याचा मोठा आनंद तिच्या आई-वडीलांसह गावकऱ्यांना झाला. आज निकाल लागल्यानंतर गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात तिचं स्वागत आणि अभिनंदन केलं.
गावाचा पाणीप्रश्न प्राधान्यानं सोडविणार
विजयी झाल्यानंतर 'एबीपी माझा'शी बोलतांना सरपंच प्रिया सराटे यांनी नव्या जबाबदारीचा विनम्रतापूर्वक स्वीकार करीत असल्याचं म्हटलं आहे. गावकऱ्यांनी मोठ्या विश्वासानं टाकलेल्या जबाबदारी कधीच तडा जाऊ देणार नसल्याचं म्हटलं आहे. नैराट गाव खारपाण पट्ट्यात येत असल्यानं पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न गावात आहे. गावाला सध्या 15 दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा होतो आहे. ही परिस्थिती सुधारणे ही सर्वात मोठी प्राथमिकता राहणार असल्याचे त्या 'एबीपी माझा'शी बोलतांना म्हणाल्या. गावकऱ्यांना प्राथमिक सुविधा पुरवितांना इतर विकासाच्या योजनांना प्राधान्य देणार असल्याचं सरपंच प्रिया सराटे यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)