बैठकीला गौतम अदानी अन् पहाटेचा शपथविधी, अजितदादांचा गौप्यस्फोटानंतर शरद पवारांनी मॅटर कसा हँडल केला?
Ajit Pawar And Sharad Pawar : अजित पवार यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत केलेल्या गौप्यस्फोटानंतर एकच खळबळ उडाली. त्यावर शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.
मुंबई : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. या प्रचारादरम्यान, अनेक नेतेमंडळी जन्या प्रसंगांचा नव्याने उल्लेख करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील 2019 सालच्या सरकार स्थापनेच्या नाट्यमय घडामोडींबद्दल काही गौप्यस्फोट केल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. अजित पवार यांनी यावेळी केलेल्या विधानात अद्योगपती गौतम अदानी यांचा संदर्भ आल्यामुळे त्या विधानाला चांगलीच हवा मिळाली. दरम्यान, त्यांनी केलेल्या विधानानंतर यू-टर्न घेतला. त्यावर शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?
अजित पवार यांनी 13 नोव्हेंबर रोजी एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी 2019 सालच्या सरकारस्थापनेच्या नाट्यावर भाष्य केलं. 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत जाण्यासाठी एक बैठक झाली. या बैठकीला उद्योगपती गौतम अदानीही उपस्थित होते. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, शरद पवार, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणीस उपस्थित होते, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला होता. शरद पवार यांना पहाटेच्या शपथविधीची कल्पना होती, असंही अजित पवार म्हणाले. अदानींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सरकार स्थापनेचा निर्णय झाला होता. मात्र खापर माझ्यावर फुटलं असा दावाही अजित पवार यांनी केला. त्यांच्या या विधानानंतर एकच खळबळ उडाली होती.
अजित पवारांचा यू टर्न
पुढे मात्र बीडच्या एका प्रचारसभेनंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी मी गौतम अदानी यांच्याबाबत केलेल्या विधानाचा ध चा मा केला जात आहे. त्यांचा राजकारणाशी काडीमात्र संबंध नाही, असे स्पष्टीकरण करत अजित पवार यांनी दिले होते.
शरद पवार यांनी काय स्पष्टीकरण दिले?
शरद पवार यांनी 'साम टीव्ही' या मराठी वृत्तवाहिनीला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी अजित पवार यांनी केलेल्या दाव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी अजित पवार यांचा दावा पूर्णपणे फेटाळला आहे. अजित पवार म्हणतात माझी संमंती होती? पण त्यानुसार सरकार स्थापन झाले का? असे सरकार स्थापन झाले नाही, मग प्रश्नच येतो कुठे? असे शरद पवार म्हणाले. मी अनेक उद्योगपतींची भेट घेतो. रतन टाटा, किर्लोसकर अशा उद्योगपतींच्या निवासस्थानी मी जात असे. राज्याच्या विकासात सहभागी होणाऱ्या उद्योगपतींची भेट घेतली तर कुठे बिघडले? मी अदानी यांची भेट घेण्यासाठी अनेकदा अजित पवारांना सोबत घेऊन गेलेलो आहे. राजकीय निर्णयात आम्ही उद्योगपतींचा सल्ला घेत नाही. उद्योगपतींचा राजकारणात सहभाग नसतो, असेही शरद पवार म्हणाले.
हेही वाचा :
मुंबईत ठाकरेंची मोठी खेळी, मनसेचा बडा मोहरा फोडला, अखिल चित्रे ठाकरे गटात प्रवेश करणार