मुंबईत ठाकरेंची मोठी खेळी, मनसेचा बडा मोहरा फोडला, अखिल चित्रे ठाकरे गटात प्रवेश करणार
Maharashtra Assembly Elections 2024 : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाने मनसेला मोठा धक्का दिला आहे. अखिल चित्रे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.
मुंबई : ऐन विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections 2024) तोंडावर शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) शिंदे गटाला धक्का दिला. वरळीमधील शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde Group) पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. या पाठोपाठ शिवसेना ठाकरे गटाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) मोठा धक्का दिला आहे.
मनसे विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस आणि वांद्रे उपविभाग प्रमुख अखिल चित्रे (Akhil Chitre) यांचा थोड्याच वेळात मातोश्रीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. अखिल चित्रे हे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात (Vandra East Assembly Constituency) मनसेकडून माजी आमदार तृप्ती सावंत (Trupti Sawant) यांना तिकीट दिल्यामुळे नाराज होते.
मनसेला मोठा धक्का
तृप्ती सावंत यांना बाहेरून शेवटच्या क्षणी आयात करून मनसेकडून उमेदवारी दिल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. अखिल चित्रे यांनी 2019 मध्ये वांद्रे पूर्व इथून मनसेकडून निवडणूक लढवली होती. त्यांना जवळपास 11 हजार मतं मिळाली होती. अखिल चित्रे हे मनसेच्या टेलिकॉम सेनेचे कार्याध्यक्ष आहेत. मात्र आता अखिल चित्रे मनसेला जय महाराष्ट्र करून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. यामुळे विधानसभेच्या तोंडावरच मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
सोशल मीडियावरुन व्यक्त केली होती नाराजी
दरम्यान, वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेच्या माजी आमदार तृप्ती सावंत यांना रिंगणात उतरवलं आहे. त्यानंतर मनसेचे नाराज नेते अखिल चित्रे यांनी सोशल मीडियावरुन नाराजी व्यक्त केली होती. अखिल चित्रेंनी तृप्ती सावंत, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असलेले विद्यमान आमदार झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) आणि भाजप पदाधिकारी यांच्या भेटीचा एक फोटो शेअर केला होता. ह्याला म्हणतात हिट विकेट.. मॅडम, भाई आणि सहकारी निवडणूक चर्चा, असं कॅप्शन देत मनसे उमेदवार तृप्ती सावंत आणि राष्ट्रवादीचे उमेदवार झिशान सिद्दीकी यांच्या भेटीचा फोटो अखिल चित्रे यांनी शेअर करत निशाणा साधला होता. यानंतर अखिल चित्रे हे मनसेला जय महाराष्ट्र करणार, अशा चर्चा रंगू लागल्या होत्या.
इतर महत्त्वाच्या बातम्या