Praful Patel : नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत प्रफुल्ल पटेलांचे स्पष्टीकरण; नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच, मात्र...
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने नवाब मलिक यांना विधानसभे करिता एबी फॉर्म दिला. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar NCP) गटाने नवाब मलिक यांना विधानसभे करिता एबी फॉर्म दिला. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) म्हणाले की, नवाब मलिक (Nawab Malik) पूर्वी सुद्धा आमचे सहकारी होते. आजही आहेत. त्यामुळे त्यांना एबी फॉर्म देण्यात आला. यात काही नवीन नाही. परंतु याबाबत इतर मित्र पक्षांशी आम्ही चर्चा करणार आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता कशाप्रकारे येईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रफुल्ल पटेल म्हणाले. गोंदिया येथे प्रसारमाध्यमांसोबत बोलत असताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.
नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच, मात्र...
दाऊदच्या हस्तकाशी आर्थिक व्यवहार केल्याचा ठपका असणारे अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांना उमेदवारी देण्याच्या मुद्द्यावरुन सध्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. भाजपचा विरोध असतानाही अजित पवार (Ajit Pawar) यांनी नवाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा एबी फॉर्म दिला होता. यानंतर भाजपच्या वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या पार्श्वभूमीवर एबीपीच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी नवाब मलिक (Nawab Malik) यांचा भक्कमपणे बचाव केला. त्या पाठोपाठ आता प्रफुल्ल पटेल यांनी ही स्पष्टीकरण दिले आहे.
दिवंगत नेते आर.आर. पाटील हयात नसताना अजित पवार यांनी सिंचन चौकशीचे खापर आर. आर. पाटील यांच्यावर फोडलं. यावर बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की याविषयी मला जास्त माहिती नाही. काल मी व्यस्त कार्यक्रमामुळे याविषयी जास्त माहिती घेऊ शकलो नाही. मुंबईला गेल्यानंतर याविषयी मी अजित पवार आणि सहकाऱ्यांशी बोलनार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी गोंदिया येथे दिली.
नवाब मलिकांनी शिवाजीनगर-मानखुर्द मतदारसंघातून भरला उमेदवारी अर्ज
नवाब मलिक यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवाजीनगर-मानखुर्द विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. नवाब मलिक घरातून उमेदवारी अर्ज भरायला निघाले तेव्हा त्यांच्याकडे राष्ट्रवादीचा एबी फॉर्म नव्हता. मात्र, मलिकांनी वेळ पडल्यास अपक्ष लढायचे, असा चंग बांधला होता. अखेर शेवटच्या क्षणी नवाब मलिक यांना अजितदादा गटाकडून एबी फॉर्म पाठवण्यात आला आणि त्यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी याप्रकरणाचा पाठपुरावा केला होता. त्यामुळे आता नवाब मलिक यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज मागे न घेतल्यास देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे इतर नेते काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या