अजित पवारांनी विद्यमान आमदाराचे तिकीट कापले; चंद्रिकापुरेंनी थेट शरद पवारांनाच गाठले
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात एबी फॉर्म मिळेल या आशेने अर्जुनी मोरगाव विधानसभेचे आमदार मनोहर चंद्रिकापूरे आज सकाळपासून बसून होते.

मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी आणि अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. कोण कोणत्या पक्षातून कोणत्या पक्षात जाईल हे सांगता येत नाही. काही दिवसांपूर्वी अजित पवारांसोबत स्टेजवर असलेले नेते आज शरद पवारांसोबत त्यांच्या कारमध्ये दिसून येत आहेत. तर, महाविकास आघाडीकडून इच्छुक असलेले काहीजण अजित पवार किंवा महायुतीचा हात पकडताना पाहायला मिळत आहे. महायुतीत विद्यमान आमदाराची जागा त्या त्या पक्षाला हे गणित जवळपास निश्चित झालं आहे. त्यानुसार, भाजपने उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केलीय. तर, अजित पवारांकडून (Ajit pawar) उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात येत आहे. मात्र, अजित पवारांनी एका विद्यमान आमदाराच्या तिकीटालाच कात्री लावल्याने संबंधित आमदाराने थेट वाय.बी.चव्हाण सेंटर गाठून शरद पवारांची भेट घेतली. गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचं तिकीट अजित पवारांकडून कापण्यात आलंयय. चंद्रिकापूरे यांनी तत्काळ वाय.बी. चव्हाण सेंटरची वाट धरत शरद पवारांची भेट घेतली.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात एबी फॉर्म मिळेल या आशेने अर्जुनी मोरगाव विधानसभेचे आमदार मनोहर चंद्रिकापूरे आज सकाळपासून बसून होते. मात्र, अचानक भाजपचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांचा अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघासाठी अजित पवार यांनी पक्ष प्रवेश करुन घेतला आणि त्यानंतर नाराज होत मनोहर चंद्रिकापूरे यांनी तत्काळ वाय.बी. चव्हाण सेंटरचा रस्ता धरला. सायंकाळच्या सुमारास मनोहर चंद्रिकापुरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली, तसेच राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची मागणी केली आहे. एबीपी माझाला मिळालेल्या विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार अद्याप तरी मनोहर चंद्रिकापूरे यांच्याबाबत कोणताही शरद पवारांनी निर्णय घेतलेला नाही. मात्र, त्यांना उद्या पुन्हा भेटीसाठी बोलविण्यात आल्याचे समजते. दरम्यान, मनोहर चंद्रिकापुरे यांनी गत निवडणुकीत राजकुमार बडोलेंचा जवळपास 800 मतांनी पराभव केला होता.
राजकुमार बडोले राष्ट्रवादीचे उमेदवार?
माजी मंत्री आणि भाजप नेते राजकुमार बडोले यांनी हातावर घड्याळ बांधण्यास नकार दिला होता. मात्र, आज अजित पवारांच्या उपस्थितीत त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आहे. गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी मतदारसंघ भाजपचा पारंपरिक मतदारसंघ आहे, तर तिथे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर चंद्रिकापुरे आमदार आहेत. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षांमध्ये मतदारसंघासाठी रस्सीखेच सुरू असताना राजकुमार बडोले पक्षांतर करतील आणि हातावर घड्याळ बांधतील अशी चर्चा समाज माध्यमांवर सुरू झाली होती. अखेर, आज राजकुमार बडोले राष्ट्रवादीत प्रवेश केला. भाजपचे अनेक दशकांपासून चे कार्यकर्ते असून पक्षावर आणि पक्ष नेतृत्वावर पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र, विद्यमान महायुतीच्या जागावाटपात ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला असल्याने बडोले यांनी अजित पवारांसोबत जाणे पसंत केले. त्यामुळे, त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. म्हणूनच, मनोहर चंद्रिकापुरे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे धावा केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
