देशाचे विरोधी पक्ष नेते खटाखट पैसे देतो असे सांगतात, मग आम्ही काय गोट्या खेळत नाही; अजित पवार यांची राहुल गांधींवर टीका
आम्ही दीड हजार दिल्यावर महाविकास आघाडी पंचसूत्री म्हणत 3 हजार द्यायला निघाले आहे. मग तुमचं सरकार होतं तेव्हा तुम्ही झोपा काढत होता का? असा सवाल करत अजित पवार यांनी राहुल गांधींवर टीका केलीय.
Ajit Pawar criticized on Rahul Gandhi : मुंबईत महाविकास आघाडीची संयुक्त सभा पार पडली. यावेळी बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी गॅरंटी देत प्रत्येक महिन्याला महिलांच्या खात्यावर 3 हजार रुपये खटाखट जमा होणार, असे आश्वासन दिले. तर महाराष्ट्रातील महिलांना बस सेवा मोफत दिला जाईल, एक रुपया घेतला जाणार नाही. भाजप सरकारने महागाई वाढवली आहे. बेरोजगारी वाढवली आहे. त्यामुळे आमची पहिली गॅरंटी म्हणजे महिलांना 3 हजार रुपये आणि मोफत बससेवा सुरु करण्याची आहे, असं काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले. दरम्यान, याच मुद्द्यावरून आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राहुल गांधींवर टीका करत निशाणा साधला आहे.
आम्ही दीड हजार दिल्यावर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) पंचसूत्री म्हणत 3 हजार द्यायला निघाले आहे. मग तुमचं सरकार होतं तेव्हा तुम्ही झोपा काढत होता का? देशाचे विरोधी पक्ष नेते खटाखट पैसे देतो असे सांगतात, देशाचे विरोधी पक्ष नेते उल्लू बनवत आहेत, पण आम्ही काही गोट्या खेळत नाही, असा टोलाही अजित पवार यांनी राहुल गांधींला लगावला आहे.
इस्लामपूर मधील नेतृत्वाने गलिच्छ राजकारण केलं
गेल्या अनेक वर्षापासून जे नेते सांगत आहेत घड्याळाचे बटन दाबा, मी देखील तेच सांगतोय. मी काही वेगळं सांगत नाही. मी मुस्लिम समाजाला देखील बरोबर घेऊन काम करतो. मुस्लिम समाज देखील महत्त्वाचा आहे, त्या समाजाला देखील संधी मिळाली पाहिजे. म्हणून मी इद्रिस नायकवडी यांना विधान परिषदेवर आमदार केलं. अगदी गलिच्छ राजकारण इस्लामपूर मधील नेतृत्वाने केले आहे. नेतृत्व विकास करणारे लागतं. नुसतं काय सांगता, काय बोलता, असं बोलून होत नाही. अरे काय सांगता काय सांगता, मी जे सांगतो तुमच्या डोक्यात घुसत नाही मग काय सांगू, असा मिश्किल टोलाही अजित पवार यांनी यावेळी लगावला.
जयंत पाटलांना गावातील पोलीस स्टेशन बांधता येत नाही
जयंत पाटलांच्या गावातील पोलीस स्टेशन आज देखील भाड्याच्या जागेत आहे. जयंत पाटलांना त्यांच्या गावातील पोलीस स्टेशन बांधता येत नाही आणि हे निघाले राज्याचे नेतृत्व करायला. कशाला तर राज्यातील सर्व पोलीस स्टेशन भाड्याच्या जागेत न्यायला. असे म्हणत अजित पवार यांच्याकडून जयंत पाटील यांच्यावर टीका केली आहे. जयंत पाटील यांनी त्यांच्या व्याहींना सांगावं. इस्लामपूर आष्टामध्ये एखादा कारखाना टाकावा. उमेदवारांना उभ करायचं आणि तिथं मॅच फिक्सिंग करून मिलि भगत करून उमेदवार पाडायचं हे राजकारण जयंत पाटलांचे आहे. नेता जर काट्याने काटा काढायला लागला तर लोकांनी विश्वास ठेवायचं कोणावर? असा घणाघातही अजित पवार यांनी यावेळी केला. निवडणुकीपुरतं आमचं राजकारण असतं, निवडून आल्यावर आम्ही राज्याची कामे करण्यासाठी बसतो, असेही ते म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या