ABP Cvoter Exit Poll : भाजपचे '45 प्लस'चे स्वप्न भंगणार? भाजप आणि महायुतीच्या जागा घटणार असल्याचा एक्झिट पोलचा अंदाज
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : राज्यात महाविकास आघाडी यंदा चांगली कामगिरी करणार असल्याचं एक्झिट पोलच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे. तर महायुतीला मात्र धक्का बसणार असल्याचं दिसतंय.
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : चारशे नाही पण पावणे चारशेपर्यंत मजल मारून भाजप केंद्रातील सत्ता राखणार असं एबीपी सी व्होटर सर्व्हे (ABP Cvoter Exit Poll 2024 ) आणि इतर प्रमुख सर्व्हेमधून समोर आलं आहे, पण या एक्झिट पोलमुळे राज्यातील भाजपसमोरची चिंता मात्र वाढण्याची शक्यता आहे. कारण गेल्या वर्षभरापासून भाजपने राज्यात मिशन 45 साठी काम केलं. पण एक्झिट पोलमध्ये मात्र महायुतीचा आकडा हा 22 ते 26 इतका असल्याचं दिसतंय. त्यापैकी भाजपला 17 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपचे 45 प्लसचे स्वप्न महाराष्ट्रात भंगणार का, भाजपच्या घोडदौडीला महाराष्ट्र लगाम लावणार का असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं ही येत्या 4 जून रोजी मिळणार आहेत.
महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी
एबीपी सी व्होटरचा सर्व्हे समोर आला असून त्यामध्ये महायुतीला 48 पैकी 22 ते 26 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. तर महाविकास आघाडीला 23 ते 25 जागा मिळण्याचा अंदाज सांगितला. महायुतीच्या 22 ते 26 जागांपैकी 17 जागा या भाजपला मिळणार असल्याचं सांगितलं आहे.
भाजपच्या जागांमध्ये घट होणार
गेल्या वेळच्या तुलनेत यंदा भाजपच्या जवळपास सहा जागा घटणार असल्याचं सांगितलं आहे. गेल्या वेळी भाजपने 23 जागा जिंकल्या होत्या. ती संख्या आता 17 वर येणार असल्याचं चित्र आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिंदे यांच्या शिवसेनेला सहा जागा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक जागा मिळण्याचा अंदाज आहे. महायुतीच्या तीनही पक्षांची एकत्रित संख्या ही 22 ते 26 पर्यंत असून 26 च्या पुढे ती जाणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
भाजपच्या मिशन 45 प्लसचे स्वप्न भंगणार
गेल्या वेळी भाजप आणि सेनेच्या एकूण जागा या 42 इतक्या होत्या. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर सत्तेत आलेल्या शिंदेंच्या सोबत शिवसेनेचे 40 हून अधिक आमदार आणि 13 खासदार आले होते. त्यामुळे भाजपने राज्यात मिशन 45 प्लस आखलं आणि त्या पद्धतीने राजकीय डावपेच आखायला सुरुवात केली. नंतरच्या काळात राष्ट्रवादीमध्ये फुट पडल्यानंतर अजित पवारांनीही भाजपची साथ दिली. त्यामुळे भाजपच्या मिशन 45 प्लसला अधिक बळ मिळाल्याचं चित्र होतं.
मिशन 45 च्या वाटेत अडचणीच्या ठरणाऱ्या शरद पवारांना भाजपने अजित पवारांच्या माध्यमातून बारामतीमध्ये अडकवण्याचा प्लॅन केला. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्यावर नियंत्रण ठेवण्याठी एकनाथ शिंदेंचा वापर केला. त्याचवेळी भाजपने आपला पक्ष बळकट करण्यासाठी पक्षसंघटनेवर मोठ्या प्रमाणात लक्ष दिलं. लोकसभेच्या प्रचारासाठी खास नियोजन आखून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या जंगी सभांचं आयोजन करण्यात आलं.
विधानसभेच्या निवडणुकीवर परिणाम होणार
सी व्होटरचा सर्व्हे असेल वा इतर काही सर्व्हे असतील, भाजप देशात पावणेचारशेच्या जवळ जात असला तरी महाराष्ट्रात मात्र त्याचा वारू रोखण्यात महाविकास आघाडीला यश आल्याचं या अंदाजातून स्पष्ट दिसतंय. शरद पवार- उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या आघाडीने महाराष्ट्रात भाजपला फक्त कडवी झुंजच दिली नाही तर त्यांनी मोठं यशही पदरात पाडून घेतल्याचं या अंदाजातून दिसतंय. अंदाजाप्रमाणे जर खरोखरच महाविकास आघाडीने जर मजल मारलीच तर त्याचा परिणाम येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्येही दिसण्याची शक्यता आहे आणि ही भाजपसोबतच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासाठी धोक्याची घंटा असेल.
एबीपी सी व्होटर एक्झिट पोल
महायुती
भाजप : 17
शिंदे गट : 6
अजित पवार गट : 1
महाविकास आघाडी
ठाकरे गट : 9
काँग्रेस : 8
शरद पवार गट : 6
इतर : 1
एनडीए (NDA) : 353-383
इंडिया आघाडी (INDIA Alliance) : 152-182
इतर : 4 -12
(Disclaimer : ABP C व्होटर एक्झिट पोल सर्वेक्षण 19 जून ते 1 जून 2024 दरम्यान घेण्यात आला. त्याची सँपल साईज ही 4 लाख 31 हजार 182 इतकी आहे आणि हे सर्वेक्षण सर्व 543 लोकसभेच्या जागांवर करण्यात आले. त्यामध्ये देशातील 4,129 विधानसभा जागांचा समावेश आहे. ABP C व्होटर सर्वेक्षणाचे त्रुटीचे मार्जिन राष्ट्रीय स्तरावर +3 आणि -3 टक्के तर प्रादेशिक स्तरावर +5 आणि -5 टक्के इतकं आहे.)
ही बातमी वाचा: