Eknath Shinde: वीजबिलात 30 टक्के कपातपासून शेतकऱ्यांना 15 हजार रुपयांपर्यंत...; एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
Eknath Shinde Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महायुतीकडून 10 घोषणा देखील एकनाथ शिंदेंनी केल्या आहेत.
Eknath Shinde Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महायुतीचे सरकार (Mahayuti Goverment) पुन्हा राज्यात आणण्यासाठी कोल्हापूरकरांचा सिंहाचा वाटा असला पाहिजे. येत्या 23 तारखेला छोट्या मोठ्या लवंग्यांऐवजी अँटम बॉम्ब फोडायचा आहे, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले. तसेच महायुतीकडून 10 घोषणा देखील एकनाथ शिंदेंनी केल्या आहेत. यामध्ये राज्यात 25 हजार महिलांची पोलीस भरती, लाडक्या बहिणींना प्रतिमहिना 2100 रुपये, 25 लाख रोजगार निर्मिती करणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोणत्या घोषणा केल्या?
1) राज्यातील लाडक्या बहिणींना प्रतिमाही 2100 रुपये, पोलीस दलात 25 हजार महिलांची भरती.
2) शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेत 15 हजार रुपये.
3) प्रत्येकाला अन्न आणि निवाऱ्यांची हमी.
4) वृद्ध पेन्शनधारकांना 2100 रुपयांची मदत.
5) जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवणार.
6) राज्यातील तरुणांना 25 लाख रोजगार देणार.
7) 45 हजार पांदण रस्ते बांधणार.
8) अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांना 15 हजार रुपये वेतन.
9) वीज बिलात 30 टक्के कपात.
10) शंभर दिवसात व्हिजन महाराष्ट्र 2029 सादर करणार.
प्रत्येक बहीण ही लखपती व्हावी- एकनाथ शिंदे
राज्यातील महायुती सरकारने महिला भगिनींना सक्षम करण्याचा निर्णय घेतला आहे. याच भूमिकेतून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली असून या योजनेमुळे अनेक माता भगिनींना सन्मान मिळाला आहे. लेक लाडकी लखपती योजनेद्वारे मुलींना 18 वर्षांच्या होईपर्यंत टप्प्याटप्प्याने 1 लाख पर्यंत रक्कम मिळणार आहे. महिला बचत गटांच्या खेळत्या भाग भांडवलात वाढ केली असून त्यांच्या उत्पादनांचे ब्रँडिंग व मार्केटिंग करून त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. प्रत्येक बहीण ही लखपती व्हावी अशी आमची इच्छा असल्याचे एकनाथ शिंदेंनी सांगितले.
महाविकास आघाडीचा आज जाहीरनामा प्रसिद्ध होणार-
महाविकास आघाडीचा आज जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. मुंबईतील बीकेसीत महाराष्ट्र स्वाभिमान सभेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी, पवार गटाचे प्रमुख शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत जाहीरनाम्याचं प्रकाशन करण्यात येणार आहे. महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ फोडताना राहुल गांधी आज पाच गॅरंटींची घोषणा करणार आहेत. या गॅरंटीमध्ये आरोग्य, नोकर भरती, कर्ज माफी महिलांना आर्थिक मदत या संदर्भात घोषणा करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.