दे धक्का! शिंदे गटाचा आता भाजपलाच धक्का, मुंबईतील 100 हून अधिक महिला ब्रिगेड शिंदे गटात सामिल
Eknath Shinde : शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदे गटाकडून पक्षवाढीसाठी प्रयत्न सुरु होते.

Eknath Shinde : शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदे गटाकडून पक्षवाढीसाठी प्रयत्न सुरु होते. राज्यातील अनेक शिवसैनिकांनी शिंदेंना पाठिंबा दर्शवला होता. राज्यात अनेक ठिकाणी शिवसेनेला खिंडार पडले होते. आता एकनाथ शिंदे गटाकडून थेट भाजपमध्ये खिंडार पाडण्यात आले आहे. रविवारी भाजपच्या तब्बल 100 महिलांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीत मुंबईतील प्रभाग क्रमांक 25 च्या भाजपा माजी वार्ड अध्यक्षा प्रीती इंगळे यांच्यासह 100 महिलांनी एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. पुढील काही दिवसांमध्ये मुंबईमध्ये निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमिवर भाजपला हा मोठा धक्का मानला जातोय.
राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असताना शिंदे गटाकडून आता भाजपमध्येच खिंडार पाडण्यात आलं. शिंदे गटाने चक्क भाजपचेच पदाधिकारी फोडले आहेत. शिंदे गटाचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीत प्रभाग क्र.25 च्या भाजपा माजी वार्ड अध्यक्षा प्रीती इंगळे यांच्यासह 100 महिलांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केलाय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचा असलेले बोरिवली मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम उपनगरात शिवसेना शिंदे गटाचे पक्ष वाढवण्याचा जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्यानुसार, आज भाजपच्या 100 महिलांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. आमदार प्रकाश सुर्वे यांनी मुंबईमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पहिला माजी नगरसेविका शितल मात्रे यांना फोडून शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केले होते. त्यानंतर बोरिवली आणि दहिसर परिसरामध्ये आमदार प्रकाश सुर्वे यांनी मोठा संख्या मध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना फोडून शिंदे गटात पक्ष प्रवेश केला आहेत.
दरम्यान, आमदार प्रकाश सुर्वे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मानले जात होते. पण एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोरी करत सुर्वे यांनी गुवाहटी गाठली होती. बंडखोरीनंतर विधान भवनाचा पायरीवर आदित्य ठाकरे यांनी जेव्हा प्रकाश सुर्वे यांना प्रश्न विचारला होता, तेव्हापासून प्रकाश सुर्वे चर्चेमध्ये आले होते. एकनाथ शिंदे यांनी प्रकाश सुर्वे यांच्यावर मुंबईतील जबाबदारी दिली आहे. पुढील काही दिवसांत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत. त्याच पार्श्वभुमीवर शिंदे गटाकडून आपली ताकद वाढवली जात आहे. मुंबईचा पश्चिम उपनगरात पक्ष वाढवण्यासाठी प्रकाश सुर्वे यांच्या खांद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडून मोठे जबाबदारी देण्यात आली आहे. याच जबाबदारीचा अंतर्गत आज आमदार प्रकाश सुर्वे यांनी भाजपच्या 100 महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना फोडून शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केला आहे.
आदित्य ठाकरेंनी काय विचारलं होतं?
विधान भवनाचा पायरीवर प्रकाश सुर्वे यांना आदित्य ठाकरे यांनी विचारलं होतं, की तुम्ही आमचे अत्यंत जवळचे होतात. मतदानानंतर तुमच्या घरी जेवायला येणार होतो. मात्र तुम्ही बंडखोरी केलीत?




















