मोठी बातमी! शिक्षकांचा दहावी, बारावी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार; निकाल वेळेत लागणार का?
SSC -HSC Exam : विभागीय शिक्षण मंडळात (Divisional Education Board) सोमवारी सायंकाळपर्यंत 550 उत्तरपत्रिकांचे गठ्ठे परत आल्याचे पाहायला मिळत आहे.
SSC -HSC Exam : दहावी, बारावी परीक्षांचा निकाल यंदा वेळेवर लागणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण राज्यभरातील 59 हजार अंशत: अनुदानित शिक्षकांनी (Teacher) थेट दहावी, बारावी उत्तरपत्रिका (Answer Sheet) तपासणीवर बहिष्कार टाकला असल्याचे समोर आले आहेत. त्यामुळे अनेक शाळांमध्ये (School) उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तपासणीविना पडून असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे विभागीय शिक्षण मंडळात (Divisional Education Board) सोमवारी सायंकाळपर्यंत 550 उत्तरपत्रिकांचे गठ्ठे परत आल्याचे पाहायला मिळत आहे. तर छत्रपती संभाजीनगर विभागात (Chhatrapati Sambhaji Nagar Division) हे प्रमाण अधिक आहे.
राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांची 21 फेब्रुवारीपासून तर दहावीच्या विद्यार्थ्यांची 1 मार्चपासून परीक्षांना सुरुवात झाली आहे. असे असतानाच आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी अंशत: अनुदानित शिक्षकांनी दहावी, बारावी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. अनेक शिक्षकांनी तपासणीसाठी पाठवलेले पेपरचे गठ्ठे परत पाठवले आहेत. त्यामुळे आता दहावी, बारावीचा निकाल वेळेवर लागणार का? अशी चिंता विद्यार्थ्यांना लागली आहे. तर, यावर आता शिक्षण विभाग कसा तोडगा काढणार हे देखील पाहणे महत्वाचे असणार आहे.
थेट कारवाई होणार, मंडळ मान्यताही रद्द करणार...
दरम्यान, शिक्षकांच्या या भूमिकेवरून शिक्षण विभागाने देखील कडक पाऊल उचलण्याची तयारी केली आहे. उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तपासणीविना परत आल्यावर शिक्षण मंडळाने मुख्याध्यापक, प्राचार्यांना पत्र पाठवले आहेत. ज्यात तपासणीविना उत्तरपत्रिका परत आल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. ज्या शाळा-कनिष्ठ महाविद्यालय उत्तरपत्रिका न तपासता परत पाठवणार आहेत, त्यांच्या महाविद्यालयाचा दहावी-बारावीचा निकाल राखीव ठेवण्यात येणार आहे. सोबतच मंडळ मान्यताही रद्द करण्यात येईल, असा इशारा शिक्षण मंडळाने दिला आहे.
दहावी-बारावी परीक्षेत कॉपीचे प्रकार...
21 फेब्रुवारीपासून राज्यातील बारावी आणि दहावीच्या परीक्षांना सुरवात झाली आहे. मात्र, याच परीक्षेत अनेक ठिकाणी कॉपी सुरु असल्याचे प्रकार समोर आले आहेत. जालना, बीड, लातूर जिल्ह्यात तर उघडपणे परीक्षा केंद्रावर बाहेरून कॉपी पुरवल्या जात असल्याचे समोर आले आहेत. विशेष म्हणजे भिंतीवर चढून जीव धोक्यात घालून तरुण कॉपी पुरवत असल्याचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाच्या कॉपी मुक्त अभियानाला सर्रासपणे केराची टोपली दाखवली जातांना दिसत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI