NAAC Ranking : नॅक रँकिंग ही विद्यार्थ्यांची फसवणूक, शिक्षणाच्या बाजारीकरणाचा डाव; 'नॅक'च्या माजी अध्यक्षांचा आरोप
NAAC Ranking : नॅक रँकिंग ही विद्यार्थ्यांची फसवणूक असून शिक्षणाच्या बाजारीकरणाला बळ दिले जात असल्याचा आरोप नॅकचे माजी अध्यक्ष भूषण पटवर्धन यांनी केला.
NAAC Ranking : नॅक रँकिंग ही विद्यार्थ्यांची साफ फसवणूक असून खोट्या रँकिंग देण्याची एक हजार टक्के हमी देणारी यंत्रणा खालपासून वरपर्यंत असल्याचा खळबळजनक आरोप नॅकचे माजी अध्यक्ष भूषण पटवर्धन यांनी केला आहे. नॅकच्या रँकिंग खोट्या असून त्याआधारीत अनुदाने दिली जात असल्याचे त्यांनी म्हटले. आपण राजीनामा दिला नव्हता. मात्र, इच्छा व्यक्त केलेले पत्रच राजीनामा म्हणून स्वीकारले असल्याचा दावाही त्यांनी केला.
उच्च शिक्षण आणि इतर शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदेकडून (NAAC) करण्यात येते. त्यांनी दिलेल्या मूल्यांकनाच्या आधारे महाविद्यालये, विद्यापीठांना अनुदान दिले जाते. काही दिवसांपूर्वीच भूषण पटवर्धन यांनी नॅकच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. एबीपी माझाला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी नॅकचा गैरकारभार आणि शिक्षणाच्या बाजारीकरणावर भाष्य केले. भूषण पटवर्धन यांनी म्हटले की, नॅककडून करण्यात आलेल्या रँकिंग या खोट्या आहेत. ही बाब माझ्या लक्षात आल्यावर रँकिंगमध्ये कसा बदल हवा, यावर श्वेत पत्रिका काढली. ही श्वेतपत्रिका बहुमताने स्वीकारली. पण त्यावर काहीही अंमल करण्यात आला नाही. मी राजीनामा दिलाच नव्हता. फक्त इच्छा व्यक्त केली. सुधारणा व्हावी हा त्यामागचा हेतू होता. पण तेच पत्र राजीनामा दाखवून स्वीकारले गेले असल्याचे पटवर्धन यांनी सांगितले. मी त्यांना नको असल्यानेच हा सगळा प्रकार ठरवून केला असल्याचा दावाही त्यांनी केला. नॅक होणारी रँकिंग ही शिक्षण संस्थेची नव्हे तर अभ्यासक्रमाची होणे आवश्यक असल्याचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला.
परदेशी विद्यापीठांसाठी लॉबी कार्यरत
आपण परदेशी विद्यापीठाला विरोध केला म्हणून राजीनामा स्वीकारण्याची घाई केली असावी अशी शंका त्यांनी व्यक्त केली. शिक्षणाचे बाजारीकरण हळूहळू व्यापक केले जात आहे. त्यामुळे शिक्षण महाग होणार आहे. मुलांना ते परवडणार नाही असेही त्यांनी म्हटले. परदेशी विद्यापीठाना बोलावून त्यांना 'रेड कार्पेट' ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी एक लॅाबीचा काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. या लॉबीला परदेशी विद्यापीठे या देशात आणायची आहेत, असा दावाही त्यांनी केला. परदेशी विद्यापीठांना सर्व नियमातून सूट देण्याचा निर्णय माझ्या दृष्टीने चुकीचा असल्याचे पटवर्धन यांनी म्हटले. परदेशी विद्यापीठे भारताकडे बाजारपेठ म्हणून पाहत आहेत. त्यांच्यासाठी एक लॉबी कार्यरत आहे. परदेशी शैक्षणिक वातावरण निर्मिती आपल्या विद्यापीठामध्ये करायला पाहिजे. परदेशात उत्तम नावीन्य पूर्ण संशोधन चालते. भारतीय विद्यापीठांना देखील मोकळीक दिली पाहिजे, अशी आग्रही भूमिका पटवर्धन यांनी मुलाखती मांडली. भारतीय विद्यापीठ आणि परदेशी विद्यापीठांमध्ये सामंजस्य करार झाला पाहिजे. हा एक चांगला मार्ग असल्याचे पटवर्धन यांनी सांगितले.
विद्यापीठ अनुदान आयोग भारतातील विद्यापीठासाठी आहे. परदेशी विद्यापीठांच्या नियमनासाठी संसदेत कायदा मंजूर करावा लागेल. मात्र, त्याप्रमाणे सुधारणा झाल्या नसल्याचे त्यांनी म्हटले. भारतीय विद्यापीठांना नियमात बांधून ठेवून परदेशी विद्यापीठांना सवलत देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे स्पर्धा योग्य पातळीवर होणार नसल्याचा आरोप त्यांनी केला.
नॅक ही विद्यार्थ्यांची फसवणूक
नॅक ग्रेडींग हीच विद्यार्थ्यांची खूप मोठी फसवणूक असल्याचा आरोप भूषण पटवर्धन यांनी केला. नॅक ग्रेड देण्याचे रेट कार्ड असून 1000% आम्ही आपणास ग्रेड देऊ इंटरनेटवर जाहिराती असल्याचा दावा त्यांनी केला. या संस्थांनी मदत घेतली त्यांना फायदा झाला असेही त्यांनी म्हटले. या प्रकाराची चौकशी व्हावी अशी मला आशा आहे असे त्यांनी म्हटले. या प्रकारामुळे शैक्षणिक क्षेत्राचे नव्हे तर देशाचं नुकसान आहे, देशाच्या भावी पिढीचे नुकसान आहे. विद्यार्थ्यांच्या आणि देशाच्या हिताशी आपण खेळतो आहोत, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.
पाहा व्हिडीओ : NAAC Grade Scam : 'नॅक'मध्ये पैसे घेऊन मूल्यांकन देणारी साखळी, माजी नॅक प्रमुखांचा खळबळजनक आरोप
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI