Heat Wave: 'सीबीएसईसह केंद्रीय बोर्डाच्या शाळा सकाळच्या सत्रात घ्या', वाढत्या तापमानामुळे पालकांची शालेय शिक्षण मंत्र्यांकडे मागणी
खारघरमध्ये उष्माघाताने झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर नवी मुंबई पालक संघटना व त्यासोबत राज्यातील इतर पालक संघटनांनी केंद्रीय बोर्डाच्या शाळा या फक्त सकाळच्या सत्रात सुरू ठेवाव्यात, अशी मागणी शालेय शिक्षण मंत्री यांना केली आहे.
मुंबई : राज्यातील वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय बोर्डाच्या शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी करण्यात आली आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर पालकांची शालेय शिक्षण मंत्र्यांकडे ही मागणी केली आहे. तर काही शाळांकडून सकाळी 11 च्या आधी शाळा भरवण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान राज्यामध्ये मागील आठ दिवसापासून उन्हाचा तडाखा (Heat Wave) वाढला आहे. त्यामुळे वाढत्या तापमानाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होऊ नये यासाठी ही मागणी करण्यात आली आहे.
राज्यातील वाढत्या तापमानामुळे पालक वर्ग चिंतेत आहे. खारघरमध्ये उष्माघाताने झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर नवी मुंबई पालक संघटना व त्यासोबत राज्यातील इतर पालक संघटनांनी सीबीएसई व इतर केंद्रीय बोर्डाच्या शाळा या फक्त सकाळच्या सत्रात सुरू ठेवाव्यात, अशी मागणी शाळा प्रशासन आणि शालेय शिक्षण मंत्री यांना केली आहे. राज्यभरात उष्णतेची लाट आणि दुपारच्या सत्रात भरणाऱ्या शाळा पाहता पालक वर्गाने चिंता व्यक्त केली आहे. ही मागणी केल्यानंतर काही शाळांनी शाळा स्तरावर आपल्या शाळांच्या वेळेमध्ये बदल करण्याचे ठरवलं असून सकाळी 11 च्या आधी शाळांचे वर्ग भरवले जात आहेत.
सीबीएसई शाळा या दहा मेपर्यंत सुरू राहणार
सीबीएसई व इतर केंद्रीय बोर्डाच्या शाळा या उत्तर भारतातील हवामानाचा विचार करत देशभरात मे च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत सुरू असतात. राज्यात सुद्धा सीबीएसई शाळा या दहा मेपर्यंत सुरू राहणार असून त्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्ट्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणार आहेत. मात्र शाळा दहा मे पर्यंत सुरू ठेवताना त्या सकाळच्या सत्रात भरवल्या जाव्यात असं पालक वर्गाने पत्र देऊन मागणी केली आहे.
राज्यातलं तापमान वाढलं काही भागांमध्ये पारा 40 अंशांवर
राज्यातील तापमानाचा पारा दिवसेंदिवस उच्चांक गाठत आहे. या वर्षी तापमानात खूप वाढ झाली आहे एप्रिल महिन्यातच तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचल्याने नागरिक हैराण झाले आहेत. अंगाची लाही लाही होत असताना उन्हामुळे घराबाहेर पडणं कठीण होत आहे. तच नवी मुंबईतील खारघर इथे पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात उष्माघातामुळे चौदा जणांचा मृत्यू झाला. पुढील दोन दिवस तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पुढील दोन दिवस विदर्भाच्या तापमानात अधिक वाढ होण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI