रायगड झेडपी बांधकाम खात्यातील बलात्कारी अधिकाऱ्याला 19 सप्टेंबरपर्यंत कोठडी
Raigad ZP : रायगड जिल्हा परिषदेतील बांधकाम खात्यातील अधिकारी योगेश पाटीलची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
रायगड : जिल्हा परिषदेच्या बांधकाम खात्यातील अधिकारी असलेल्या योगेश पाटीलला 19 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. योगेश बालकृष्ण पाटील याच्यावर एका तरुणीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणीने तक्रार दाखल करताच योगेश पाटीलला पेण पोलिसांनी मागील आठवड्यात बेड्या ठोकल्या होत्या. योगेशची पोलीस कस्टडी संपल्यानंतर आता त्याला 19 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. योगेश पाटील हा सध्या अटक आहे.
कोण आहे योगेश पाटील?
योगेश पाटील हा रायगड जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागात अधिकारी पदावर आहे. त्याची पेण येथील रहिवासी असलेल्या 30 वर्षीय तरुणी सोबत 2018 साली फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. ते दोघे एकमेकांना वारंवार भेटत होते आणि याच भेटीचे पुढे रूपांतर प्रेमात झाले.
आरोपी योगेश पाटील याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून 2018 पासून वारंवार शरीर संबंध ठेवले होते. पीडितेने एप्रिल 2021 साली लग्नासाठी योगेश याच्याकडे विचारणा केली असता त्याने लग्न करण्यास नकार दिला. एप्रिल 2022 साली योगेश पाटील याच्या जाचाला कंटाळून पीडित तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पीडितेने योगेश पाटीलसोबत बोलणे बंद केले होते. तरीही योगेश याने तिच्याशी पुन्हा संपर्क करण्यास सुरवात केली. पुन्हा लग्नाचे खोटे आश्वासन देत शरीरसुखाची मागणी करु लागला.
पीडित तरुणी वाशी येथील व्ही.एल.सी.सी इन्सिटीट्यूट येथे 30 ऑगस्ट रोजी गेली असता आरोपी योगेश पाटील याने या तरुणीला वाशी रेल्वे स्टेशन येथे बोलावून शिविगाळ आणि मारहाण केली. त्यानंतर तिला वाशी येथे सोडून निघून गेला. आरोपी योगेश पाटील हा आपल्यासोबत लग्न न करता आपला वापर फक्त शरीरसुखासाठी करत आहे हे लक्षात आल्यावर पीडितेने 30 ऑगस्ट रोजी पेण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सदर घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलिस करीत आहेत.
ही बातमी वाचा :