Valentine Day 2023 : 'व्हॅलेंटाइन डे' निमित्त तरुणीला प्रपोज करणं पडलं महागात, नांदेडच्या तरूणावर गुन्हा दाखल
Valentine Day 2023 : व्हॅलेंटाइन डे निमित्त तरुणीला प्रपोज करणं नांदेडमधील तरूणाला चांगलंच महागात पडलं आहे. प्रपोज करणाऱ्या तरूणावर विनयभंग आणि पोक्सो अंतर्गत नांदेडच्या वाजीराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Valentine Day 2023 : आज जगभर व्हॅलेंटाइन डे साजरा केला जात आहे. या दिवशी अनेक जण आपल्याला आवडत असणाऱ्या प्रियकरारा किंवा प्रेयसीला प्रपोज करत आपलं प्रेम व्यक्त करत असतात. परंतु, नांदेड येथे व्हॅलेंटाइन डे निमित्त तरुणीला प्रपोज करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. संबंधित तरूणीने तरूणाविरोधात वजिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तरूणावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
नांदेड शहरातील एका कॉलेजमध्ये बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या या तरुणाने आपल्या वर्गातीलच अल्पवयीन असणाऱ्या तरुणीला गुलाबाचे फुल हातात धरून माझी गर्लफ्रेंड होशील का? म्हणून प्रपोज केलं. परंतु, अशा प्रकारे तरुणीला प्रपोज करून प्रेम व्यक्त करणं या मजनुला चांगलच महागात पडलंय. तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी संबंधित तरुणावर विनयभंग आणि पोक्सो अंतर्गत नांदेडच्या वाजीराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिकांनी तरूणाला अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
112 नंबरवरून तक्रार
या तरूणाने उद्या 'व्हॅलेंटाईन डे' आहे तू माझी गर्लफ्रेंड हो म्हणत विनयभंग केल्याची तक्रार तरूणीने पोलीस ठाण्यात दिली. मुलाने प्रपोज केल्यानंतर घाबरलेल्या मुलीने तात्काळ 112 क्रमांकावर संपर्क साधला आणि घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत आरोपी मुलाला कॉलेज परिसरातूनच ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार मुलीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आहे. तर, आरोपी मुलाचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पोक्सो अंतर्गत गुन्हा दखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.