यशश्रीचा मोबाईल कुठे आहे? यशश्री दाऊदच्या संपर्कात होती का? पोलिसांनी महत्त्वाच्या तीन प्रश्नांची उत्तरं दिली!
Yashashree Shinde case update : यशश्रीची हत्या झाल्यापासूनच दाऊद शेख फरार होता. दाऊद शेख याला पोलिसांनी कर्नाटकातून अटक करण्यात आली. आरोपी दाऊद शेखच्या (Dawood Shaikh) मुसक्या आवळण्यात पोलिसांना अखेर यश आलं आहे.
नवी मुंबई : उरणमधील यशश्री शिंदे (Yashashree Shinde) हत्याप्रकरणात पोलिसांनी आज पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. याप्रकरणातील आरोपी दाऊद शेख याला पोलिसांनी कर्नाटकातून अटक करण्यात आली. आरोपी दाऊद शेखच्या (Dawood Shaikh) मुसक्या आवळण्यात पोलिसांना अखेर यश आलं आहे. यशश्रीची हत्या झाल्यापासूनच दाऊद शेख फरार होता. उरणमधील सातरहाठी येथील 22 वर्षीय यशश्री शिंदे 25 जुलै रोजी बेपत्ता झाली होती. याबाबत उरण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. पोलीस तपास सुरु असताना उरणमधील सगीर ब्रदर्स पेट्रोल पंपामागील मैदानावरील झुडूपामध्ये या तरुणीचा मृतदेह आढळून आला.यशश्री शिंदे हिच्या संपूर्ण शरिरावर वार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचं उघड झालं होतं.
दरम्यान आज नवी मुंबई पोलिसांनी याबाबत अधिक माहिती दिली. पोलीस म्हणाले, "हत्या होऊन आज पाच दिवस झाले. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीचा शोध सुरु होता. नातेवाईक, मित्र, तीन चार जणांवर संशय होता. कर्नाटक येथे पथक गेले होते. आज सकाळी दाऊद शेखला अटक करण्यात आली आहे"
यशश्री दाऊदच्या संपर्कात होती का?
आरोपीचे लोकेशन मिळत नव्हते. त्याच्या मित्राने माहिती दिली. यानंतर कर्नाटकातील अलर गावातून दाऊद शेखला अटक केली. याबाबत आरोपीने कबुली दिली आहे. यशश्री आणि आरोपी दाऊदमध्ये मैत्री होती. मात्र मागील तीन चार वर्षात यशश्री ही दाऊदच्या संपर्कात नव्हती, असं पोलिसांनी सांगितलं.
किडनॅप करुन हत्या केली का?
पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये डॅाक्टरांनी सांगितले की तिचा चेहरा प्राण्यांनी विद्रुप केल्याची शक्यता आहे. यशश्रीला किडनॅप करून मारलेले नाही. तिला बोलवून घेतले होते. यशश्री आणि दाऊद हे दोघेही अनेक वर्षापासून उरणमध्ये राहतात. त्यांची जुनी ओळख आहे. एकत्र शाळेत होते का याची माहिती घेतली जात आहे.
दोघे एकत्र भेटणार होते. कदाचित दोघे भेटल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला असावा, यातून आरोपीने हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. अजून चौकशी बाकी आहे, असं पोलिसांनी सांगितलं.
दाऊदला कसा पकडला, मोबाईलचं काय झालं?
दाऊदचा मित्र मोसीन हा मयताच्या संपर्कात होता. पण त्यानेच आरोपीला अटक करण्यात मदत केली, असंही पोलीस म्हणाले. सद्या तरी एकच आरोपी असल्याचे समोर येत आहे. यामध्ये अजून चौकशी चालू आहे, असं पोलिसांनी सांगितलं.
दाऊद शेख उरणमध्ये राहिला होता. कोरोना काळात तो कर्नाटकात गेला, तिथे ड्रायव्हर म्हणून काम करत होता. यशश्रीचा मोबाईल सापडले नाही, आरोपीला इकडे आणल्यानंतर मोबाईल ताब्यात घेऊ, असं पोलीस म्हणाले.