मुलीने फेक अकाऊंटवरुन मैत्रिणीलाच मुलाच्या नावाने प्रपोज केलं, अपघाती मृत्यूचा बनाव; साताऱ्यात धक्क्याने तरुणीने संपवलं जीवन
Satara Crime News : सोशल मीडियावरुन मैत्रिणीनं मैत्रीणीची मोठी फसवणूक केली, यामुळे तरुणीनं आत्महत्या करुन आपलं आयुष्य संपवल्याचंही समोर आलं आहे.
Satara Crime : सातारा : सर्व नात्यांपैकी मैत्रीचं नातं भारी आणि वेगळं मानलं जातं. मैत्रीच्या नात्यात कधी मीपणा नसतो, संकटकाळात आपल्या मित्राला-मैत्रिणीला एकटं सोडून न जाता, त्याच्या सोबत ते संकट झेलणारं नातं असतं. पण अशाच जीवाभावाच्या मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना साताऱ्यात घडली आहे. सध्याचं युग सोशल मीडियाचं आहे, असं म्हटलं जातं. पण याच सोशल मीडियामुळे मैत्रिणीनं मैत्रीणीची मोठी फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. एवढंच नाहीतर, यामुळे तरुणीनं आत्महत्या करुन आपलं आयुष्य संपवल्याचंही समोर आलं आहे.
साताऱ्यात (Satara Crime) राहणाऱ्या दोन मैत्रिणी. मैत्री एकदम घट्ट, पण परिस्थिती बदलली आणि एकीच्या मनात भलतंच आलं. एकीनं डोक्यात प्लान रचला आणि इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट बनवून मैत्रिणीची चेष्ठा करायचं ठरवलं. तसं तिनं एक फेक अकाउंटही तयार केलं. त्यानंतर तिच्याशी गप्पा मारुन तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर दोघांमध्ये सोशल मीडियावरुनच प्रेमाचं सूत जुळलं. त्यानंतर मैत्रिणीनं पुढचा डाव टाकला. ज्या मुलाच्या नावानं तिनं मैत्रिणीला प्रेमात पाडलं, त्याच मुलाच्या खोट्या वडिलांना समोर आणलं. आपल्या मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याची बाब, त्या मुलाच्या बनावट बापानं सोशल मीडियावरुन दिली. पण, मस्तीची कुस्करी होते म्हणतात ना... तसंच काहीसं झालं. अस्तित्वातच नसलेल्या खोट्या प्रियकराच्या मृत्यूच्या बातमीनं मैत्रिणी हादरली. तिथं मागचा पुढचा विचार न करता थेट टोकाचं पाऊल उचललं. गळफास घेऊन तरुणीनं आयुष्य संपवलं. मैत्रिणीची चेष्ठा एवढी महागात पडली की, तिच्यामुळे तिच्याच मैत्रिणीला आपलं आयुष्य संपवावं लागलं. या प्रकरणात चेष्ठा करणाऱ्या तिच्या मैत्रिणीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना साताऱ्यातील वठार येथे घडली आहे.
नेमकं काय घडलं?
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील वाठार येथील ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रूतूजा दिलीप पवार आणि तिची मैत्रिण गायत्री भोईटे या दोघी जीवाभावाच्या मैत्रिणी, दोघी एकाच कॉलेजमध्ये शिकत होत्या. एकत्र पदवी शिक्षण पूर्ण केलं. पण, गायत्रीने रुतूजाची चेष्टा करण्याचं ठरवलं. गायत्रीने एका मुलाचं फेक इंस्टाग्राम अकाऊंट बनवलं आणि रुतूजाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. गायत्री फेक अकाऊंटवरुन रुतूजासोबत रात्रंदिवस चॅट करायची, यामुळे रुतूजाच्या या प्रेमाच्या जाळ्यात दिवसेंदिवस आणखी अडकत गेली. न बोलता न भेटता रुतूजाला आयुष्यातील पहिलं प्रेम मिळालं.
रुतूजा त्याच्या प्रेमात चांगलीच अडकली होती. गायत्री त्या गोष्टीची मजा घेत होती. मात्र रुतूजा जास्तच प्रेमात अडकल्याचं लक्षात आल्यावर गायत्रीने आणखी एक इन्स्टावर अकाऊंट बनवून तिने ते मुलाच्या वडिलांचं असल्याचं दाखवलं आणि माझ्या मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याचं रुतूजाला सांगितले. सोशल मीडियावरून मिळताच, रुतूजाला मोठा धक्का बसला आणि तिने आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं. तिला तो धक्का सहन झाला नाही आणि तिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येनंतर पोलिसांनी रुतूजाचा फोन चेक केला असता त्या दोन इन्टावरचे अकाऊंट समोर आलं. पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने माहिती घेतली असता तिची मैत्रिण गायत्री हीच्याच मोबाईल वरुन हे दोन अकाऊंट तयार झाल्याचं समोर आलं. यानंतर पोलिसांनी गायत्रीला ताब्यात घेतल्यावर हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला. पोलिसांनी गायत्रीला आता बेड्या ठोकल्या असून वाठार पोलिस या प्रकरणाचा आणखी तपास करत आहेत.