ठाण्यात गेल्या 6 महिन्यांत तब्बल 2,724 अंमली पदार्थांचे गुन्हे; 55.76 कोटींचा मुद्देमाल जप्त
अंमली विरोधी पथकाने 1 जानेवारी ते 23 जून, 2024 या कालावधीत तब्बल 55 कोटी 76 लाख 10 हजारांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत.
ठाणे : पुणे ड्रग्जप्रकरणावरुन राज्यातील वातावरण तापलं असताना पोलिसांच्या कारवाईला गती मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यासह (Pune) राज्यातील इतरही जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभाग अलर्ट झाला असून कारवाईला सुरुवात झाली आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनातही राज्यातील ड्रग्ज (Drugs) प्रकरणाचा मुद्दा गाजणार असल्याचे आज घेण्यात आलेल्या सत्ताधारी व विरोधकांच्या पत्रकार परिषदेवरुन लक्षात येते. त्यातच, आता मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातच अंमली पदार्थांची मोठी तस्करी होत असल्याचं गेल्या 6 महिन्यांतील आकडेवारीवरुन दिसून येईल. ठाणे अंमली पदार्थ तस्करीचे जंक्शन झाल्याने ठाणे पोलीस (Thane Police) आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना तस्करांचे कंबरडे मोडण्याचे निर्देश दिले आहेत. शाळा, कॉलेज, निर्जन ठिकाणी लक्ष केंद्रित करीत सेवन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
अंमली विरोधी पथकाने 1 जानेवारी ते 23 जून, 2024 या कालावधीत तब्बल 55 कोटी 76 लाख 10 हजारांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. तर, 2 हजार 586 गुन्हे दाखल करीत 2 हजार 724 आरोपींना रस्ता दाखविण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. बुधवारी(ता-26 जून) रोजी ठाणे पोलिसांनी ठाण्यात जनजागृती करीत चित्ररथ आणि विद्यार्थी रॅलीचे अनावरण ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याहस्ते केले. समाजात फोफावणारी अंमली पदार्थ सेवन करण्याची प्रवृत्ती आणि संस्कृतीला चाप लावण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालय कशोशीने प्रयत्न करीत आहे. त्यात ठाणेकरांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त ठाणे पोलिसांनी जनजागृती मोहिम सुरू केली आहे. त्यानुसार, बुधवार (ता-26 जून) ते शनिवार (ता-29 जून) पर्यंत आयुक्तालयाच्या हद्दीतील महाविद्यालये, शाळा, बाजारपेठ आदी ठिकाणी अमली पदार्थ मानवी आरोग्याला किती हानिकारक आहे, याबाबत जनजागृती केली जाणार आहेत. बुधवारी ठाण्याच्या ननजीभाई खिमजीभाई ठाणावाला कॉलेजच्या विद्यार्थ्यांची अंमलीपदार्थ व त्याचे दुष्परिणाम याबाबत रॅलीची सुरुवात करण्यात आली.
अंमली पदार्थ खरेदी-विक्री 2 हजार 586 गुन्हे दाखल
ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि अंमली विरोधी पथकाने 1 जानेवारी ते आजपावेतो केलेल्या धडक कारवाईमध्ये अंमली पदार्थ खरेदी-विक्री प्रकरणी 2,586 गुन्हे दाखल करून 2,724 आरोपींना अटक केलेली आहे.
ठाणे पोलिसांनी 2,541 जणांवर गुन्हे दाखल करून 2,612 आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. अंमली पदार्थ खरेदी-विक्री करणाऱ्या 71 तस्करांवर गुन्हे दाखल करीत 112 आरोपींना अटक करण्यात आली. तर, एकूण 55 कोटी 76 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ठाण्याच्या कासारवडवली येथील खाडी किनारच्या रेव्ह पार्टीवर छापेमारी करून 5 आरोपींवर गुन्हा दाखल करून 7 लाख 85 हजाराचे अंमली पदार्थ हस्तगत केले आहेत.
गुन्हे शाखा युनिट-1 कासारवडवली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात 15 ग्रॅम एमडी हस्तगत केलं. सखोल तपासानंतर उत्तर प्रदेशातील अंमली पदार्थ कारखानाच उध्वस्त केला. 45 कोटींचा 3 किलो 164 ग्रॅम एमडी हस्तगत केलं आहे.
गुन्हे शाखा युनिट-3 कल्याण दोन आरोपीना अटक करून 3 किलो 4 ग्रॅम अंमली पदार्थ 4 कोटी 50 लाखांचे अंमली पदार्थ जप्त केले.
दरम्यान, अंमली विरोधी पथकाने 8 आरोपीना अटक करून 31 लाख 48 हजार रुपयांचा 314.8 ग्रॅम एमडी हस्तगत केला आहे. 4 किलो 850 ग्रॅम चरस हस्तगत केला असून त्याची किंमत 24 लाख 25 हजार रुपये आहे. सादर आरोपींवर संघटीत गुन्हेगारी अंतर्गत मोक्कानुसार कारवाई केली आहे.