Nashik News: आधी धमकी दिली, नंतर खंडणी मागितली; नाशकातील स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या उपासीका अटकेत
Crime News: 2014-15 साली नाशिकच्या सिडको परिसरातील अनेक स्वामी समर्थ केंद्रांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असल्यानं तक्रारदार निंबा शिरसाट आणि त्यांची चांगली ओळख झाली होती.
Nashik News: नाशिकमध्ये (Nashik News) समोर आलेल्या एका घटनेमुळे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेले श्री. स्वामी समर्थ सेवा केंद्र चर्चेचा विषय ठरलं आहे. बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत दिंडोरीच्या स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्रात सक्रीय सहभागी असलेले तसेच अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठ या न्यासाच्या विश्वस्त मंडळावर सदस्य असलेल्या निंबा शिरसाट यांच्याकडून केंद्राच्या उपासीका सारिखा सोनवणे यांनी 10 कोटी 50 लाखांची खंडणी मागितली होती. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणात तिच्या मुलाचाही सहभाग असल्यानं या दोघांविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात खंडणीसह माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, 10 लाखांची रोख रक्कम स्वीकारताना त्यांना बेड्याही ठोकण्यात आल्या आहेत. संशयित आरोपी सारिखा सोनवणे या स्वतः कृषी अधिकारी देखील आहेत.
2014-15 साली नाशिकच्या सिडको परिसरातील अनेक स्वामी समर्थ केंद्रांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असल्यानं तक्रारदार निंबा शिरसाट आणि त्यांची चांगली ओळख झाली होती. जानेवारी 2022 मध्ये आरोपी आणि तिचा मुलगा यांनी शिरसाट यांना माझा मुलगा आयटी एक्सपर्ट असून आम्हाला तुम्ही पैसे न दिल्यास तुमचे मॉर्फ व्हिडीओ करून व्हायरल करू, असं धमकवत त्यानंतर वेळोवेळी व्हॉटसअॅप कॉल करून पैसे मागण्यास सुरुवात केली.
जानेवारी 2023 मध्ये आरोपी यांनी शिरसाट यांना प्रशांत नगरच्या स्वामी समर्थ केंद्रात भेटून आरोपीचे मोबाईलमधील व्हिडीओ शिरसाट यांना दाखवून 20 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली, पैसे न दिल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकीही दिली. त्यानंतर घाबरलेल्या शिरसाट यांनी 50 लाख रुपये नोव्हेंबर 2023 मध्ये देऊ करताच सारिखा सोनवणे यांनी मोबाईल मधील व्हिडीओ डिलीट केल्याचं दाखवलं. मात्र पुन्हा आरोपी सोनवणे यांनी 10 कोटी 50 लाखांची मागणी करत गुन्हा दाखल करण्याची तसेच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देताच शिरसाट यांनी कंटाळत पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली आणि त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत 10 लाखांची रोख रक्कम स्वीकारताना आईसह मुलाला अटक केली.
त्यांच्या घरातून 10 लाख रुपये, 1 लॅपटॉप आणि 3 अॅपल फोनही जप्त करण्यात आले आहे. या महिलेनं दामदुप्पट करण्याचं आमिष दाखवत काही सेवेकऱ्यांकडून पैसे गोळा केले होते, पैसे परत करू शकत नसल्यानं मी त्यांना 20 लाख रुपयांची मदत केली होती, असंही शिरसाट यांनी आपल्या तक्रारीत नमूद केलं आहे. आजपर्यंत वेगवेगळ्या कारणास्तव तब्बल 1 कोटी 5 लाख रुपये सारिखा सोनवणे यांनी शिरसाट यांच्याकडून घेतले आहेत. एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणानंतर खळबळ उडाली असून स्वामी समर्थांच्या भाविकांमध्ये हा चर्चेचा विषय ठरला आहे. हे प्रकरण नक्की काय आहे? तक्रारदारानं आत्तापर्यंत 1 कोटींहून अधिकची एवढी रक्कम का देऊ केली? या सर्व बाजूने पोलीस खोलवर तपास करणार का? तसेच गुरुमाऊली प. पू. अण्णासाहेब मोरे या प्रकरणात लक्ष घालणार का? हेच आता बघणं महत्वाचं ठरणार आहे.