परभणीत कायद्याच्या रक्षकांकडूनच कायद्याची पायमल्ली, 11 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन
अवैध धंदे, वाळु तस्कर यांच्याशी संबंध ठेवुन स्वहित जपणाऱ्या 11 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन. परभणीचे पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या धडक कारवाईने खळबळ.
परभणी : पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक असायला हवा तेव्हाच गुन्हेगारी कमी होऊ शकते. मात्र, जेव्हा पोलीसच गुन्हेगारांना मदत करून आपले उखळ पांढरे करतात तेव्हा काय गुन्हेगारी कमी होईल आणि काय कायदा व सुव्यवस्था राहील असाच प्रश्न पडतो. परभणीत अशाच गुन्हेगारांना मदत करून स्वतःचे आर्थिक हित साधणाऱ्या 11 जणांना पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्याची ज्यांची जबाबदारी असते त्याच परभणी पोलीस दलातील काही कर्मचारी स्वतःचा आर्थिक फायदा हा गुन्हेगारी जगतातील लोकांकडून करून घेत असल्याचे उघड झाले आहे. अशा एकुण 11 जणांवर परभणीचे पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
खरं तर खाकीला डाग लावणाऱ्या अशा पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईला सुरुवात ही मागील पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी केली. त्यांनीही अशाच 4 जणांना निलंबित केले होते तर एकाला बडतर्फ केले होते. उपाध्याय गेल्यानंतर आलेल्या नूतन पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनीही हे कारवाईचे सत्र सुरूच ठेवत तब्बल 11 जणांना निलंबित केले आहे. मात्र, ते पोलीस विभागाचा अंतर्गत विषय असल्याचे सांगून मीना बोलायला तयार नाहीत.
400 रुपयांच्या वादातून मित्रांमध्ये हाणामारी, एकाचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीत कैद
परभणी जिल्ह्यात एकुण 19 पोलीस ठाणे आहेत. यातील बहुतांश ठाण्यातील काही कर्मचारी थेट अवैध दारू विक्री, अवैध धंदे चालक यांच्या सतत संपर्कात असतात. त्यांच्याकडून कारवाई न करण्याचे पैसे घेतात. महत्वाचे म्हणजे इतर अधिकारी कारवाईसाठी येत असल्याची माहिती ही या गुन्हेगारांना अशा पोलिसांकडून दिली जाते. त्यातच जिल्ह्यात फोपावलेल्या अवैध वाळु उपसा करणाऱ्या वाळू तस्करांकडूनही यातील काहीजण हफ्ते घेत होते. जे पोलीस अधीक्षकांच्या कारवाईत निष्पन्न झाले आहे.
पोलीस ठाण्यातील कर्मचारी कशामुळे निलंबित झाले?
- मानवतचे कर्मचारी रसुल दाऊद शेख हे अवैध दारू, गुटखा विक्री करणाऱ्यांकडून पैसे घेत होते.
- सेलुचे संजय साळवे यांनी परितक्त्या महिलेशी जवळीक साधुन संबंध ठेवले. निराधार महिलेला संरक्षण देण्याऐवजी तिच्या एकटेपणाचा फायदा घेतला.
- पुर्णा पोलीस ठाण्यातील कर्मचारी विनोद रत्ने हे तर थेट वाळु तस्करांकडून महिनेवारी पैसे घेत असल्याचे सिद्ध झाले.
- कोतवालीचे वैजनाथ आदोडे, मो.मोसीन मो मोईन, गजानन जंत्रे, नवा मोंढाचे सूर्यकांत सातपुते, विठ्ठल कटारे, नानल पेठचे सचिन राखोंडे, सतीश कांबळे, गंगाखेडचे कृष्णा शिंदे हे आठजणही वाळू आणि अवैध व्यावसायिकांकडून पैसे गोळा करत होते.
दरम्यान पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी अशा प्रकारे गुन्हेगारांशी हितसंबध जोडून पोलीस खात्याची प्रतिमा मालिन करणाऱ्यां विरोधात कारवाईचा धडाका लावला असून ही कारवाई केवळ एवढ्या पुरतीच राहणार नसुन पुढेही अशा प्रकारे गुप्त चोकशी करून कारवाई सुरूच ठेवण्यात येणार आहे. परभणी जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्याअंतर्गत सुरु असलेल्या अवैध धंद्यांविरोधात कारवाई होत नसल्याने पोलीस अधीक्षकांना विशेष पथक यासाठी नियुक्त करावे लागले आहे. जे या अवैध धंदे चालकांवर कारवाई करत आहे.