(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Crime News : एकीनं गळफास घेत, तर दुसरीनं इमारतीवरुन उडी मारुन आयुष्य संपवलं, दोन बाल मैत्रिणींच्या आत्महत्येनं पुणं हादरलं
Maharashtra Pune Crime News : एकीनं गळफास घेत, तर दुसरीनं पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन आयुष्य संपवलं. दोन बालमैत्रिणींच्या आत्महत्येनं पुणं हादरलं
Maharashtra Pune Crime News : पुण्यातील (Pune News) हडपसरमध्ये (Hadapsar) घडलेल्या एका घटनेनं संपूर्ण पुणं हादरलं आहे. हडपसर (Hadapsar News) येथील शेवाळवाडीमध्ये दोन बाल मैत्रिणींनी आत्महत्या केल्याच्या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. एकीनं गळफास घेत जीवन संपवलं, तर दुसरीनं इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली.
सारिका हरिश्चंद्र भागवत (वय 19) आणि आकांक्षा औदुंबर गायकवाड (वय 19) अशी या मैत्रिणींची नावं आहेत. दोघींपैकी एका मैत्रिणीनं गळफास घेतला. तिला अॅम्बुलन्समधून घेऊन जात असतानाच त्याच ठिकाणी दुसरीनं इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. दोघींच्याही आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. याप्रकरणी हडपसर पोलीस अधिक तपास करत आहेत. हडपसरमधील धक्कादायक प्रकार शेवाळवाडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ क्रिस्टल सोसायटी या इमारतीत सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
हडपसर (Hadapsar Crime News) पोलिसांनी (Hadapsar Police) दिलेल्या माहितीनुसार, आकांक्षा आणि सारिका या दोघीही बालमैत्रिणी. सात वाजण्याच्या सुमारास सारिका हिनं तिच्या राहत्या घरी साडीच्या साहाय्यानं गळफास लावून आत्महत्या केली. सारिकानं गळफास घेतल्याची माहिती पोलिसांना मिळताच पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस घटनास्थळी पोहचले. तोपर्यंत फार उशीर झाला होता. सारिकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सारिकाचा मृतदेह पोलीस रूग्णवाहिकेमधून घेऊन जात होते. त्याचवेळी सारिकाची बालमैत्रिण आकांक्षानं पहिलं आणि तिनं धावत जाऊन त्याच इमारतीचा पाचवा मजला गाठला. एका क्षणाचाही विचार न करता आकांक्षानं पाचव्या मजल्यावरुन उडी घेतली आणि सारिकेला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेजवळच ती पडली. उंचीवरून पडल्यामुळे गंभीर जखमी झाल्यानं तिचाही मृत्यू झाला.
अचानक घडलेल्या घटनेमुळं संपूर्ण परिसर हादरला. दोन्ही बालमैत्रिणींच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजलेलं नाही. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी दिली आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत. ज्या मैत्रिणी लहानपणापासून एकत्र वाढल्या, एकत्र खेळल्या. त्याच मैत्रिणींनी एकाच दिवशी एकापाठोपाठ केलेल्या आत्महत्यांमुळे संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :