कोल्ड्रिंक्सच्या कारखान्यात देशी दारुचे उत्पादन, जळगावात एक्साईज खात्याच्या अधिकाऱ्यांनी असा उद्ध्वस्त केला लाखोंचा कारखाना
Jalgaon Crime News : जळगावमध्ये शीतपेय बनवण्याच्या नावाखाली सुरू असलेला बनावट देशीदारूचा कारखाना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी उद्ध्वस्त केला आहे.
Jalgaon Crime News : शीतपेय बनवण्याच्या नावाखाली सुरू असलेला बनावट देशीदारू कारखाना राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने उद्ध्वस्त करण्यात आला आहे. या कारवाईत 50 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 5 संशयितांना अटक करण्यात आली आहे. यामुळे जळगावमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना या निवडणुकीचा फायदा घेत एमआयडीसी भागात असलेल्या के-10 येथील एका आयुर्वेदिक प्रॉडक्ट या कंपनीत शीतपेय बनविण्याच्या नावाखाली बनावट देशीदारू बनवून त्याची बाजारात बेकायदेशीररित्या विक्री होत असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली.
आयुर्वेद प्रॉडक्ट कंपनीत सुरु होती बनावट दारूची निर्मिती
त्यानुसार पथकाने एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने शनिवारी मध्यरात्री या आयुर्वेद प्रॉडक्ट कंपनीत छापा टाकला. दरम्यान पोलिसांना आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना पाहून कंपनीतील कर्मचाऱ्यांनी आतून दार बंद करून घेतले होते. परंतु राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी बंद असलेला दरवाजा तोडून आत प्रवेश करत बनावट देशीदारू बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला.
50 लाखांहून अधिकचा मुद्देमाल उद्ध्वस्त
या ठिकाणी दारू पॅकिंगसाठी लागणाऱ्या रिकाम्या बॉटल्स, 32 बॅरेल तयार असलेली दारू, मशीनरी सामान आणि 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. हा मुद्देमाल जवळपास 50 लाखांहून अधिकचा असल्याचे समोर आले आहे. दरम्यान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या कंपनीच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दरम्यान या ठिकाणाहून बनावट देशीदारू हा कोणत्या ठिकाणी गेला आहे, त्या ठिकाणची देखील चौकशी करून जिल्ह्यात वितरण करण्यात आलेला मुद्देमाल मागवण्यात यावा, अशा देखील सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. एमआयडीसी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
लाखोंचे बक्षीस असलेल्या जहाल नक्षलवाद्यांला अटक; गडचिरोली पोलिसांच्या विशेष पथकाची कामगिरी
Buldhana Bus Accident : एसटी आणि खासगी बसचा भीषण अपघात; एक महिला ठार, 25 जखमी