(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shraddha Murder Case: श्रद्धा मे महिन्यातच आफताबसोबत करणार होती ब्रेकअप; तपासात नवी माहिती समोर
Shraddha Murder Case: मारहाण, भांडणांना कंटाळून श्रद्धा ही आफताबसोबत ब्रेकअप करणार होती, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या तपासात समोर आली.
Shraddha Murder Case: देशाला हादरवरून सोडणाऱ्या श्रद्धा हत्याकांड प्रकरणात (Shraddha Murder Case) तपासागणिक नवीन गोष्टी समोर येत आहेत. आफताबसोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणारी श्रद्धा वालकर (Shraddha Walker) त्याच्यासोबत ब्रेकअप करणारी होती. मात्र, तिच्या या निर्णयाने संतापलेल्या आफताबने तिची हत्या केली असल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले. श्रद्धा हत्याकांडप्रकरणी दिल्ली पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे. आफताब पूनावालाला तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'लिव्ह-इन'मध्ये राहणाऱ्या आफताब आणि श्रद्धामध्ये लहान गोष्टींवरून वाद होत असे. आफताबचे वागणं आणि त्याच्याकडून होणारी मारहाण याला श्रद्धा कंटाळली होती. त्यामुळे तिने ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला होता. श्रद्धाने 3-4 मे रोजी आफताबपासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला होता. तिचा हा निर्णय आफताबला पटला नाही. त्यामुळे तो प्रचंड संतापला होता.
दिल्ली पोलिसांना आतापर्यंतच्या तपासात अनेक पुरावे मिळाले आहेत. पोलिसांना मेहरौली आणि गुरुग्राम सीमेवरील जंगलातून 13 मानवी हाडे सापडली असून ती तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आली आहेत. श्रद्धाच्या वडिलांच्या डीएनएशी त्याची तपासणी सुरू आहे. आफताबच्या फ्लॅटमधील किचनमध्ये पोलिसांना रक्ताचे डाग दिसून आले आहेत. त्याशिवाय, 5 ते 6 इंच आकाराचे चाकूदेखील मिळाले आहेत. मात्र, हत्येसाठी वापरण्यात आलेले करवत पोलिसांना हस्तगत करता आले नाही. आफताबच्या फ्लॅटमधून काही कपडे जप्त केले आहेत. त्याशिवाय, पोलिसांनी पेटीएम, बम्बल डेटिंग अॅप, झोमॅटो आणि ब्लिंकिट सारख्या प्लॅटफॉर्मकडून माहिती जमा करण्यास सुरुवात केली आहे.
आफताबने दुसऱ्या प्रेयसीला दिलेली अंगठी जप्त
एएनआय या वृत्तसंस्थेला दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबने तिची अंगठी दुसऱ्या प्रेयसीला दिली होती. श्रद्धाच्या हत्येनंतर ही तरुणी आफताबच्या फ्लॅटवर आली होती. त्यावेळी श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये होते.
आफताबची 1 डिसेंबर रोजी नार्को चाचणी
श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणातील आरोपी आफताबची नार्को चाचणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आफताबची एक डिसेंबर रोजी नार्को चाचणी करण्यात येणार आहे. आफताबच्या जेल व्हॅनवर हल्ला झाल्यानंतर आता त्याच्या सुरक्षितेत वाढ करण्यात आली आहे. सोमवारी रात्री, आफताबची पॉलिग्राफ चाचणी केल्यानंतर त्याला पुन्हा तुरुंगात नेत असताना जमावाने पोलीस व्हॅनवर हल्ला केला. त्यावेळी काहींच्या हाती तलवारीदेखील होत्या. तर, काहींनी व्हॅनवर दगडफेकदेखील केली.