महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? साताऱ्यात अनाथाश्रमातील सेक्स स्कॅन्डल उघड, तरुणींना वेश्याव्यावसायासाठी पाडलं भाग
Satara News : सामाजिक बांधिलकीच्या नावाखाली अनाथाश्रमात सुरू असलेला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आश्रमचालक आणि त्याच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे.
![महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? साताऱ्यात अनाथाश्रमातील सेक्स स्कॅन्डल उघड, तरुणींना वेश्याव्यावसायासाठी पाडलं भाग Sex scandal exposed in Karad of Satara forced prostitution of girls in name of orphanage heinous act of lady ashram manager and her lover accused remanded to police custody till 27 August Maharashtra महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? साताऱ्यात अनाथाश्रमातील सेक्स स्कॅन्डल उघड, तरुणींना वेश्याव्यावसायासाठी पाडलं भाग](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/23/5864e0f262b6c467543be4d4b897089a172437699161288_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Satara Crime News : सातारा : आधी कोलकाता आणि त्यानंतर बदलापूरमध्ये घडलेल्या घटनांनी देश हादरला. अशातच आता साताऱ्यातील आश्रमात मुलींना वेश्या व्यावसायात ढकलल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आश्रमचालक महिला आणि तिच्या प्रियकराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. साताऱ्यातील कराडमधील टेंबू गावातील निराधार आश्रमात ही घटना घडली. याप्रकरणातील आरोपींना 27 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठोठवण्यात आली आहे.
सामाजिक बांधिलकीच्या नावाखाली अनाथाश्रमात (Orphanage Sex Scandal) सुरू असलेला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आश्रमचालक आणि त्याच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. कराड येथील टेंबू या भागात हा सर्व प्रकार घडत असल्याचं समोर आलं आहे. एका युवतीच्या तक्रारीनंतर हा सर्व प्रकार समोर आला असून अनेक मुलींना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याचं समोर आलं आहे.
सातारा कराड येथील टेंबू गाव. या गावातील आई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित निराधार आश्रम या नावाखाली रेखा सकट नावाची महिला हे अनाथाश्रम चालवत होती. या अनाथ आश्रमामध्ये अनेक अनाथ मुलींची, अनाथ महिलांची भरती केली जात होती. मात्र रेखा नावाच्या या महिलेकडून अनाथाश्रमामध्ये आलेल्या मुलींना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याचं समोर आलं आहे. सातारा जिल्ह्यात राहणाऱ्या एका अनाथ युवतीनं या घटनेला वाचा फोडली. तिनं कराड पोलीस ठाण्यात झालेल्या प्रकाराची सर्व माहिती दिल्यानंतर पोलिसांनी रेखा सकट आणि तिचा प्रियकर वाल्मिकी माने या दोघांवर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. या दोघांना कराड येथील न्यायालयासमोर हजर केलं असता त्यांना 27 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
अनाथाश्रमात आलेल्या अनेक मुलींच्या बाबतीत हा प्रकार घडल्याचं तक्रारदार मुलीकडून सांगितलं जात आहे. सध्या तरी ही तक्रारदार मुलगी पुढे आले आहे. मात्र अद्याप इतर कोणीही तक्रार देण्यास पुढे आलेलं नाही. या घटनेशी निगडीत असलेल्या अनेक व्हिडीओ, ऑडिओ क्लिप या सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्ये आरोपी रेखा सकट ही अनाथाश्रमातील मुलांकडून स्वत:चे पाय दाबून घेण्यापासून ते घरातील सर्व कामं करुन घेत असल्याचं दिसत आहे. इतकंच नाही तर ज्या मुली सांगितलेलं काम ऐकत नाहीत, अशा मुलींना ती लोखंडी पट्टीनं मारत असल्याचंही एका व्हिडीओमधून दिसत आहे. तसेच, ऑडिओ क्लिप मधूनही अनेक धक्कादायक प्रकार समोर येताना पहायला मिळत आहेत.
एका ऑडिओ क्लीपमध्ये तर आश्रमात आलेल्या एका गतीमंद मुलीवर झालेल्या आत्याचाराची सेटलमेंट करण्यासाठी चक्क पैशाची देवाणघेवाण झाल्याचा विषयही समोर आला आहे. सध्या पोलिसांनी एका फिर्यादी मुलीवरून याबाबत कराड तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. मात्र या तक्रारीनंतर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओ आणि ऑडीओ क्लिपमुळे आता कराड पोलीस नेमका कोणत्या दिशेनं, कशा पद्धतीनं तपास करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)