Sasoon Hospital Drug Racket : चुकीला माफी नाही! 'ससून'च्या अधिष्ठात्यांपासून शिपायांपर्यंत सगळे चौकशीच्या फेऱ्यात; प्रत्येकाची कसून चौकशी होणार
Sasoon Hospital Drugs Racket : राज्य सरकारने स्थापन केलेल्या चौकशी समिती आरोप प्रत्यारोरानंतर आता चौकशी सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत 80 जणांची चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे.
पुणे : सध्या पुण्यातील (Pune Crime) ड्रग्ज प्रकरणात अनेकांचे धारेदोरे पुढे (Sasoon Hospital Drug Racket) येत आहे. यामध्ये पोलीस, ससून रुग्णालयातील व्यवस्थापन आणि राजकीय नेत्यांवर या प्रकरणात संशयाची सुई आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारकडून चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्य सरकारने स्थापन केलेल्या चौकशी समिती आरोप प्रत्यारोरानंतर आता चौकशी सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत 80 जणांची चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे.
ससून रुग्णालय ड्रग्स रॅकेट प्रकरणात मोठी अपडेट
यामध्ये 'ससून' रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांपासून शिपायांपर्यंत सगळे चौकशीच्या फेऱ्यात आहेत. रुग्णालयाचे अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक, कक्ष क्रमांक 16 मधील कर्मचारी यांची समितीकडून कसून चौकशी करण्यात आली. याचबरोबर 2020 पासून आतापर्यंत रुग्णालयात दाखल झालेल्या प्रत्येक कैदी रुग्णांची माहिती समितीने मागितली. या चौकशीतून अनेक बाबी उघड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ससून ड्रग्ज प्रकरणात ही चौकशी समिती महत्वाची भूमिका बजावणार आहे.
चौकशीसाठी चार सदस्यीय समिती
ड्रग्ज माफिया ललित पाटील पुण्यातील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानं खळबळ उडाली होती. त्यात ललितला कोण पाठिशी घालत होतं, याचा तपास ही चौकशी समितीकडून केली जात आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चार सदस्यीय समिती गठीत करण्याचा निर्णय राज्याचे उपसचिव प्रकाश सुरवसे यांनी घेतला होता. या समितीला 15 दिवसांमध्ये त्यांचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलं आहे. राज्य सरकारच्या या चौकशी समितीत राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सोलापूरच्या शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, नांदेडच्या न्यायवैद्यक शास्रविभागाचे प्रमुख डॉ. हेमंत गोडबोले आणि मुंबईतील ग्रॅट महाविद्यालयातील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. एकनाथ पवार यांचा समावेश आहे.
कोण-कोण चौकशीच्या फेऱ्यात?
या प्रकरणात सखोल तपास करण्यासाठी समितीच्या सदस्यांनी ससूनमध्ये हजेरी लावली होती. समितीने अधिष्ठाता कार्यालयात चौकशी केली. ससून रुग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांची समितीने चौकशी केली. त्यानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरणकुमार जाधव, कैदी रुग्ण समितीचे अध्यक्ष डॉ. सुजीत धिवारे, कैदी रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, कैदी कक्ष क्रमांक 16 मधील कर्मचाऱ्यांची चौकशी केली आहे. अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक आणि कैदी रुग्ण समिती अध्यक्षांना याप्रकरणी लेखी अहवाल देण्यास समितीने सांगितले आहे. याचबरोबर 2020 पासून आतापर्यंत ससून रुग्णालयात दाखल झालेल्या कैदी रुग्णांचा अहवाल समितीने मागितला आहे. उपचार, रुग्णालयात दाखल असलेला कालावधी, उपचार करणारे डॉक्टर, कैदी रुग्ण, त्यांचा आजार याची संपूर्ण माहिती मागवण्यात आली आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :