Santosh Deshmukh Case: वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जावर बीड कोर्टात मोठी घडामोड; मकोका लागणार की नाही, 17 जूनला निर्णय
Santosh Deshmukh Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली.

Santosh Deshmukh Case बीड: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Death Case) आज (3 जून) बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी पक्षाचे वकील उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांच्या उपस्थितीत आजचा युक्तिवाद झाला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप निश्चिती बाबत पुरेसे पुरावे असून आरोप निश्चिती करून घ्यावी, असा अर्ज उज्वल निकम यांनी न्यायालयाला सादर केला.
वाल्मिक कराडच्या (Walmik Karad) वकीलांकडून अद्याप सरकारी पक्षाकडून डिजिटल एव्हिडन्स मिळाले नसल्याचं म्हणणे मांडण्यात आलं. तर वाल्मिक कराडच्या दोष मुक्तीच्या अर्ज न्यायालयात प्रस्तावित केला आहे. या दोन्ही बाबींवर 17 जून रोजी सुनावणी होणार आहे. न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे आणि मोहन यादव यांनी माध्यमांशी संवाद साधत माहिती दिली. सदर प्रकरणावर आज जवळपास 50 मिनिटे सुनावणी झाली.
वाल्मिक कराडचे वकील काय म्हणाले?
न्यायालयात आज सुनावणी झाली. डिस्चार्ज अप्लिकेशनवर सुनावणी अपेक्षित होती पण ती झाली नाही. आज काही किरकोळ अर्जावर सरकारी पक्षाचे व आमचे म्हणणे मांडले गेले. इलेक्ट्रॉनिक्स पुरावे मागत होतो ते कोर्टात सीलबंद पद्धतीने सादर करणार असल्याचं सरकारी पक्षाने सांगितले. ज्यावेळेस पुरावे सादर करतील त्यावेळेस त्यावर चर्चा होईल. सरकारी पक्षाकडून विरोधी आरोपीच्या वकिलांना कागदपत्राची पूर्तता अद्याप झालेली नाही, असं वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे म्हणाले.
17 जूनला इतर अर्जावर एकत्रितपणे सुनावणी होणार-
डिस्चार्ज एप्लीकेशनच्या सुनावणीला वेळ लागू शकतो. येणाऱ्या तारखेला कोर्टात इतर अर्ज जे पेंडीग आहेत त्यावर सुनावणी होणार आहे. डिस्चार्ज एप्लीकेशनवर सुनावणी घेण्याअगोदर इतर अर्जावर सुनावणी घ्या, असं कोर्टाचे निरीक्षण आहे. सरकारी पक्षाच्या वकिलाने मालमत्ता जप्ती संदर्भात अर्ज केले आहेत. कोर्टाच्या निरीक्षणानुसार 17 जूनला इतर अर्जावर एकत्रितपणे सुनावणी होणार असल्याची माहिती वाल्मिक कराडचे वकील मोहन यादव यांनी दिली.
सरकारी वकील उज्जव निकम काय म्हणाले?
वाल्मिक कराडला मकोकाचा नियम लागू होतो का? यासंदर्भात 17 तारखेला निर्णय होईल. 17 तारखेला दोन्ही पक्षांचे ऐकून न्यायालय निर्णय देईल. आरोपी वाल्मिक कराडची सर्व स्थावर मिळकत चल आणि अचल जप्तीसाठी अर्ज दिला होता. त्यांच्या वकिलांनी न्यायालयात उत्तर दिले आहे. त्यावर 17 तारखेला सुनावणी होईल. या खटल्यात मोकोकामधून दोषमुक्त करावे, असा अर्ज वाल्मिक कराडचा होता. मकोकामधून मला दोषमुक्त करावे, असा वाल्मिक कराडचा अर्ज आहे. त्यावर बचाव पक्षाने सांगितले की, वाल्मिक कराडला मकोकातून मुक्त करावं, यावर पहिले सुनावणी घेण्यात यावी. बचाव पक्षाच्या या मागणीवर आम्ही कोणतीही हरकत नसल्याचं सांगितलं. यावर 17 तारखेला युक्तिवाद होईल. केवळ वाल्मिक कराडनेच दोष मुक्तीचा अर्ज केला आहे, अशी माहिती उज्जवल निकम यांनी दिली.


















