सांगली रिलायन्स दरोडा प्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे हाती; लवकरच दरोडेखोरांपर्यंत पोहोचू; पोलिसांचा विश्वास
Sangli Reliance Robbery: सांगलीतील दरोड्याप्रकरणी आंतरराज्य स्तरावर समन्वय साधून तपास केला जात असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली आहे.
सांगली: रिलायन्स ज्वेलर्स शॉपीवर टाकण्यात आलेल्या दरोड्याप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली आहे. लवकरच या दरोडेखोरांपर्यंत पोहोचू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. सुनिल फुलारी यांनी आज सांगलीतील रिलायन्स ज्वेलर्सची पाहणी करत तपासाचा आढावा घेतला.
रविवारी सांगलीतील रिलायन्स ज्वेलर्समध्ये दिवसाढवळ्या सिनेस्टाईल दरोडा टाकून 14 कोटींचे दागिने लुटण्यात आले होते. याप्रकरणी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी रिलायन्स ज्वेलर्सची पाहणी करत जिल्हा पोलिसांच्याकडून तपासाचा आढावा घेतला आहे. संशयित दरोडेखोरांच्या पर्यंत लवकरच पोलीस पोहोचतील, त्या दृष्टीने तपास सुरू आहे. काही महत्त्वाचे धागेदोरे देखील पोलिसांच्या हाती लागल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितले आहे. या दरोड्याची उकल करण्यासाठी आंतरराज्य स्तरावर समन्वय करण्यात येतोय असेही फुलारी म्हणाले.त्याचबरोबर या दरोड्यामध्ये वापरण्यात आलेले वाहनांचे रजिस्ट्रेशन नंबर हे बनावट असल्याचं तपासात समोर आल्याचेही सुनील फुलारे यांनी स्पष्ट केले आहे.
मात्र या गाड्यांच्या खरेदीवरून त्या कोणी खरेदी केल्या आहेत याचा तपास सुरू आहे. त्याचबरोबर दरोडेखोरांपैकी काहीजण परप्रांतीय होते, तर एक जण मराठी बोलत असल्याचेही समोर आले आहे. दरोड्याच्या मागे ज्वेलर्स शॉपीत काम करणाऱ्या जुन्या-नव्या कर्मचाऱ्यांचा, सिक्युरिटी गार्डचा किंवा नोकरी सोडलेल्या कोणत्या व्यक्तीचा सहभाग आहे का? यादृष्टीनेही पोलिसांचा तपास होईल असं विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी स्पष्ट केले आहे. आरोपी वाहन सोडून पायी निघून गेलेत, पण आरोपी तिथून पुढे नेमके कुठे गेले आणि कोणत्या दिशेने गेलेत याचाही तपास सुरू आहे.
काय आहे घटना?
सांगलीतील मार्केट यार्डजवळील वसंत कॉलनीत रिलायन्स ज्वेल्स हे भव्य शोरूम गेल्या काही वर्षापासून कार्यरत आहे. रविवारी दुपारी तीन ते साडेतीनच्या दरम्यान शोरूममध्ये कोणीही नव्हते. तसेच मिरजेला जाणारा रस्ता दुरूस्तीच्या कामानिमित्त बंद होता. दरोडेखोर आतमध्ये आल्यानंतर पोलिस असल्याचे सांगून सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र बोलवले. तपास करणार असल्याचे सांगून सर्वजण एकत्र आल्यानंतर रिव्हॉल्वर बाहेर काढून त्यांच्यावर रोखले.त्यानंतर सर्वांचे हात बांधले. काहींनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना मारहाणही केली. दोघा कर्मचाऱ्यांना दरडावून सर्व दागिने, रोकड पिशवीत भरण्यास सांगितले. चांदीचे दागिने न घेता केवळ सोन्याचे दागिने, डायमंडस् आणि रोकड दरोडेखोरांनी घेतली.
दरोडेखोर दोन मोटारीतून आले. 9 ते 10 जण असल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. ते सर्वजण परजिल्ह्यातील असल्याचे स्पष्ट होत आहे. शोरूमच्या दारातील रस्ता तसेच मिरजेकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे दरोडा पडल्याचे तत्काळ कोणाला लक्षात आले नाही.
दरोडेखोरांनी 14 कोटीहून अधिक रकमेचे दागिने लांबवल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. जवळपास 80 टक्के दागिने त्यांनी लांबवले आहेत. एकूण किती मुद्देमाल लांबवला याची माहिती घेण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.
ही संबंधित बातमी वाचा: