Sangli News: सांगलीच्या विद्यार्थ्याने दिल्लीत संपवलं जीवन; नेमकं काय घडलं? शौर्यच्या वडिलांनी सगळंच सांगितलं!
Sangli News: दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्या आणि शिक्षिकांच्या जाचाला कंटाळून दहावीत शिकत असलेल्या सांगलीतील विद्यार्थ्याने मेट्रो आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Sangli News: दिल्लीतील (Delhi) सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्या आणि शिक्षिकांच्या जाचाला कंटाळून दहावीत शिकत असलेल्या मराठी विद्यार्थ्याने मंगळवारी मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून खाली रस्त्यावर उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. शौर्य प्रदीप पाटील (Shaurya Patil), असे पीडित विद्यार्थ्याचे नाव असून तो नवी दिल्लीतील राजीवनगर भागात राहत होता. शौर्य प्रदीप पाटील हा मूळचा सांगली (Sangli) जिह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वरचा रहिवासी आहे. त्याचे वडील प्रदीप पाटील हे सोने-चांदी गलाई व्यवसाय निमित्त गेल्या अनेक वर्षापासून दिल्ली येथे स्थायिक आहेत. त्यामुळे शौर्य हा त्यांच्या कुटुंबीयांसह दिल्लीतील राजीव नगर भागात भागात वास्तव्यास होता. आता शौर्यच्या वडिलांनी घटनेबाबत सविस्तर माहिती एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.
शौर्यचे वडील प्रदीप पाटील म्हणाले की, ही घटना मंगळवारी घडली. माझ्या आईचं ऑपरेशन झालं होतं. आई आयसीयूमध्ये असल्याने मी कोल्हापूरला आलो होतो. सकाळी सात वाजता माझ्या मुलाला ड्रायव्हर शाळेत सोडून आला. ड्रायव्हर मुलाची पावणे दोन वाजता वाट बघत होता. मात्र, तो आला नसल्याने ड्रायव्हरने घरी फोन केला की शौर्य अजून आलेला नाही. त्याच्या एका मित्राने त्याला गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तो मेट्रोकडे गेला. त्याच्या मित्राने माझ्या बायकोला फोन करून सांगितले की, आज शौर्य आलेला नाही. तो मेट्रोकडे गेलेला आहे. मला पावणे तीन वाजता फोन आला. तुम्ही शौर्य पाटीलचे नातेवाईक बोलत आहात का? तो पुलावरून पडलेला आहे. त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहोत. सुरुवातीला आम्हाला वाटले की काहीतरी अपघात झालेला आहे. पण जेव्हा पोलिसांशी बोलणे झाले तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितले की, त्याच्याजवळ सुसाईड नोट सापडली आहे. तेव्हा मला समजले की, त्याने आत्महत्या केलेली आहे, असे त्यांनी सांगितले.
Sangli News: तुझा ड्रामा बंद कर
प्रदीप पाटील पुढे म्हणाले की, गेल्या सात-आठ महिन्यापासून तो सांगत होता की, तिथले टीचर्स मला त्रास देत आहेत. मी तिथे पॅरेंट्स टीचर मिटिंगला देखील गेलो होतो. प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकांना शिक्षक सांगतात की, तुमचा विद्यार्थी खोडकर आहे. पण त्या नॉर्मल गोष्टी असतात. पण, त्यानंतर देखील काही विद्यार्थ्यांना शिक्षकांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. चार दिवसांपूर्वी एका शिक्षकाने त्याला सांगितले की, तुला आम्ही टीसी देऊ. तेव्हापासून तो निराश असावा. यानंतर आत्महत्येच्या दिवशी एका कार्यक्रमात तो पाय घसरून पडला. त्यावेळी शिक्षकांनी आरोप लावला की, तू पाय घसरून पडला नाही तर मुद्दाम पडलेला आहेस. तेव्हा तो खूप रडत होता. पण शिक्षकांनी त्याला म्हटले की, तुझा ड्रामा बंद कर. यावेळी मुख्याध्यापिका देखील तिथेच होत्या. पण त्यांनी देखील काही केले नाही, असा आरोप त्यांनी केलाय.
Sangli News: घटनेच्या दिवशीच शिक्षकांनी मुलाचा सर्वांसमोर अपमान केला
त्याने सुसाईड नोट लिहिलेली आहे. त्यात म्हटले आहे की, मला न्याय हा आहे की बाकीच्या मुलांसोबत शिक्षकांनी असा अत्याचार करू नये आणि हीच माझी शेवटची मागणी आहे. आमची देखील इच्छा आहे की, त्याला समाजाने न्याय द्यावा. ही घटना सर्व शाळेतल्या मुलांसमोर घडली होती. त्याला तो अपमान वाटला. सगळ्यांसमोर जो अपमान झाला तो खूप मोठा झाला. आमच्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे. दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी प्रदीप पाटील यांनी केली आहे.
Sangli News: या प्रकरणात ठोस कारवाई करावी
शौर्यचे चुलते म्हणाले की, आम्ही आज आमच्या घरातील चांगला मुलगा गमावला आहे. इथून पुढे कुठल्याही कुटुंबावर असा प्रसंग येऊ नये, अशी विनंती करत आहोत. या प्रकरणात ठोस कारवाई करावी जेणेकरून इथून पुढे तिथे असे प्रकार घडणार नाहीत, असे त्यांनी सांगितले.
आणखी वाचा























