तब्बल 903 कोटींच्या फसवणुकीचा पर्दाफाश; चिनी नागरिकासह 10 अटकेत
Hyderabad Crime News : हैदराबादच्या पोलिसांनी आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणाचा पर्दाफाश करत दोन चिनी नागरिकांसह 10 जणांना अटक केली आहे.
Hyderabad Crime News : हैदराबाद (Hyderabad News) पोलिसांनी आर्थिक फसवणुकीच्या (Financial Fraud) प्रकरणाचा पर्दाफाश करत एक चिनी नागरिक आणि एका तैवानच्या नागरिकासह 10 जणांना अटक केली आहे. सुमारे 903 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या गुन्ह्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दरम्यान, लोक्सम नावाच्या इन्व्हेस्टमेंट अॅपमध्ये 1.6 लाख रुपये गुंतवल्यानंतर एका तरुणाला आपल्यासोबत झालेल्या फसवणुकीची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनं पोलिसांत धाव घेत तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता, फसवणुकीचा मोठा प्रकार उघडकीस आला.
पोलीस तपासादरम्यान तक्रारदाराचे पैसे जिंदाई टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडच्या नावानं इंडसइंड बँकेच्या खात्यात जमा झाल्याचं निष्पन्न झालं. "परकीय चलनात व्यवहार करण्यासाठी परवाना असलेला मनी चेंजर 906 कोटींच्या या फसवणुकीत सामील आहे. त्याला परदेशात जाणाऱ्यांना परकीय चलन देण्याचा परवाना देण्यात आला. परंतु त्यांनी परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केले.", अशी माहिती या प्रकरणाचा खुलासा करताना हैदराबादचे पोलीस आयुक्त सीव्ही आनंद यांनी केला आहे.
पोलिसांकडून 10 जणांना अटक
इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, या संपूर्ण प्रकरणात दिल्ली आणि मुंबईतून हवाला रॅकेट चालवल्याबद्दल चिनी नागरिक लेक उर्फ झोंगजुन आणि तैवानचा नागरिक चु चुन-यू यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी पकडलेल्यांमध्ये साहिल बजाज, सनी, वीरेंद्र सिंह, संजय यादव, नवनीत कौशिक, मोहम्मद परवेझ, सय्यद सुलतान आणि मिर्झा नदीम बेग यांचा समावेश आहे. हैदराबादचे पोलीस आयुक्त सीव्ही आनंद यांनी सांगितलं की, दिल्लीचे रहिवाशी कौशिक यांनी गेल्या वर्षी रंजन मनी कॉर्प प्रायव्हेट लिमिटेड आणि केडीएस फॉरेक्स प्रायव्हेट लिमिटेड या दोन मनी एक्सचेंजसाठी आरबीआयकडून परवाना घेतला होता.
दोन खात्यांमधून 903 कोटी रुपयांचे व्यवहार
तपासादरम्यान रंजन मनी कॉर्पोरेशनच्या खात्यात सात महिन्यांत 441 कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. केडीएस फॉरेक्सनं 462 कोटी रुपयांचा व्यवहार केला होता. हवालाद्वारे 903 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं. यादरम्यान, एका पीडीत व्यक्तीच्या तक्रारीवरुन पुण्यातील वीरेंद्र सिंह नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली. यासंदर्भात माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, चिनी नागरिक जॅकच्या सांगण्यावरून जिंदाई टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडच्या नावानं बँक खातं उघडून इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड दिला.
प्रत्येक खात्याला 1.2 लाख रुपये कमिशन मिळत होतं
रिपोर्टनुसार, संजय यादव आणि वीरेंद्र राठोड यांना प्रत्येक खात्यामागे 1.2 लाख रुपयांचं कमिशन मिळायचं. तपासादरम्यान, हे सर्व पैसे जिंदाई टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडच्या 38 खात्यांमधून रंजन मनी कॉर्प आणि केडीएस फॉरेक्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मोठी रक्कम हस्तांतरित करण्यात आल्याचं आढळून आलं. खात्यात मिळालेले पैसे आंतरराष्ट्रीय टुर्सच्या नावानं चालवल्या जाणाऱ्या फॉरेक्स एक्स्चेंजमध्ये पाठवले जात होते.