Sidhu Moosewala Murder : वय 24 वर्षे, खून, बलात्कार, मोक्काअंतर्गत गुन्हा; कोण आहे संतोष जाधव?
शार्प शूटर संतोष जाधवच्या अटकेने आता सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत, त्याचबरोबर बॉलिवूड अभिनेता सलमान खानला दिलेली धमकी यावरुनही पडदा हटण्याची अपेक्षा आहे
मुंबई : सिद्धू मुसेवालाची हत्या कशी करण्यात आली? कितने शूटरने त्याची हत्या केली? खुनाची माहिती देणारा कोण होता? कोणी खून घडवून आणला? हत्येचा उद्देश काय होता? संतोष जाधवला अटक मग इथर शूट कुठे आहेत? मुसेवालाच्या खुनाच्या रहस्याचा उलगडा होणार? संतोष जाधवच्या अटकेने आता मुसेवालाशी संबंधित या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत, त्याचबरोबर बॉलिवूड अभिनेता सलमान खानला दिलेली धमकी यावरुनही पडदा दूर होणार आहे.
सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपींपैकी एक संतोष जाधवला पुणे ग्रामीण पोलिसांनी गुजरात राज्यातील कच्छमधून अटक केली. संतोष जाधवसोबत सूर्यवंशी नावाच्या आणखी एका साथीदारालाही पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांना रात्री बारा वाजता न्यायाधीशांसमोर त्यांच्या घरी नेऊन हजर करण्यात आलं असता त्यांना 20 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या पुणे ग्रामीण गुन्हे शाखेने सुरक्षेच्या कारणास्तव संतोष जाधवला पुण्यातील खेडमधल्या राजगुरुनगरच्या लॉकअपमध्ये हलवलं आहे. आज सकाळीच त्याला पुणे ग्रामीण गुन्हे शाखेत चौकशीसाठी आणण्यात येणार आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांच्या माहितीनुसार संतोष जाधव याच्यावर खून, गोळीबार, खुनाचा प्रयत्न, शस्त्र बाळगणे, बलात्कार अशा गुन्ह्यांची नोंद आहे. याशिवाय ओमकार उर्फ राण्या बाणखेले याच्या हत्येनंतर त्याच्यावर मोक्का लावण्यात आला होता. तेव्हापासून तो फरार होता आणि रविवारी (12 जून) त्याला गुजरातमधील कच्छमधून अटक करण्यात आली. पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेतलं आहे.
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पुण्यातील मंचरमधील सराईत गुन्हेगार ओमकार उर्फ राण्या बाणखेले याच्या खून प्रकरणात संतोष जाधव फरार झाला होता आणि पुणे गुन्हे शाखा त्याच्या शोधात होती. 'सूर्य उगवताच मी तुला संपवून टाकेन', असं स्टेटस संतोष जाधवने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केलं होतं. त्याला प्रत्युत्तर म्हणून राण्या बाणखेलेने संतोष जाधवला भेटणार आणि मारणार... कोणीही येऊ दे.. असं लिहिलं होतं. त्यानंतर 1 ऑगस्ट 2021 रोजी एका शूटरने दुचाकीवर येऊन राण्या बाणखेलेची भरदिवसा गोळीबार करुन हत्या केली. या प्रकरणी संतोष जाधववर मोक्का लावण्यात आला होता. त्यानंतर तो फरार झाला होता.
Sidhu Moosewala Murder : मुसेवाला हत्या प्रकरणातील एका आरोपीला अखेर अटक, गुजरात मधून घेतले ताब्यात
ओमकारची हत्या केल्यानंतर संतोष जाधव आणि त्याचा मित्र सौरव उर्फ महाकाळ महाराष्ट्रातून पळून गेल्याचं पुणे पोलिसाच्या सूत्रांनी म्हटलं आहे. या दोघांवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल असल्याने हे दोन्ही आरोपी फरार होते. गेल्या एक वर्षापासून या दोन्ही आरोपींनी दिल्ली एनसीआर, हरियाणा, पंजाब, राजस्थान येथे आश्रय घेतला होता. यादरम्यान या दोन्ही गुन्हेगारांची बिष्णोई टोळीतील सदस्यांशी ओळख झाली आणि अशाप्रकारे तो लॉरेन्स बिश्नोई टोळीत सहभागी झाले. संतोष जाधव याच्यावर खुनासह इतरही अनेक गुन्हे दाखल आहेत. एका प्रकरणात, संतोष जाधव यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) देखील दाखल करण्यात आला होता.
संतोष जाधव याच्यावर पुण्याच्या मंचर पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत. 2019 मध्ये बलात्काराचा गुन्हा, ऑगस्ट 2021 मध्ये ओमकारच्या खुनाचा गुन्हा, याशिवाय खंडणी आणि चोरीचा गुन्हा दाखल आहे. त्याच्याविरुद्ध राजस्थानातील गंगानगरमध्येही खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होता. संतोषने शस्त्रे हाताळण्याचे प्रशिक्षणही घेतल्याचे पोलीस सूत्रांचं म्हणणं आहे.
गुन्हेगारी विश्वात गेल्या वर्षापर्यंत संतोष जाधवचं नाव प्रसिद्ध नव्हतं. पण सोशल मीडियावर ओमकारची हत्या करण्याची घोषणा केल्यानंतर तो प्रसिद्धीच्या झोतात आला. ओमकारच्या हत्येनंतर तो वर्षभर फरार होता परंतु पोलीस त्याला पकडण्यासाठी विशेष प्रयत्न करत नव्हते. मात्र मुसेवाला खून प्रकरणात त्याचं नाव आल्यावर पोलिसांनी दिवसरात्र एक केला. संतोष जाधवला सोशल मीडियावर आपली डॉन अशी प्रतिमा दाखवण्याची फार आवड आहे. संतोष जाधव हा डॉन अरुण गवळीच्या टोळीच्या जवळचा असल्यामुळे त्याने त्याचा प्रतिस्पर्धी ओमकार बाणखेले ऊर्फ राण्याची हत्या केल्या असं पोलीस सूत्रांचं म्हणणं आहे.
संतोष जाधवची कौटुंबिक पार्श्वभूमी
संतोष जाधव हा अवघ्या 24 वर्षांचा आहे. संतोष मूळचा महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील आहे. संतोष हा पुण्यातील मंचरचा रहिवासी नाही. मंचर इथे तो एकटाच राहत होता. संतोषने प्रेमविवाह केला होता मात्र तो पत्नीसोबत राहत नव्हता. संतोषला एक मुलगीही आहे. वडिलांचे निधन झाले तेव्हा संतोष 13 वर्षांचा होता. वडिलांच्या निधनानंतर संतोष चुकीच्या संगतीत गेला, असं त्याच्या कुटुंबियांना ओळखणारे सांगतात. संतोष जाधवच्या आईचं नाव सीता जाधव आणि वडील सुनील जाधव असं आहे. संतोषला एक बहीणही आहे. पण तो कुटुंबियाच्या फार संपर्कात नव्हता.