आईला औषधांचा ओव्हर डोस देत केली हत्या; नंतर मुलाची आत्महत्या, पुण्यातील धक्कादायक घटना
Pune crime update पुण्याच्या धनकवडी भागात राहणाऱ्या एका मुलाने आपल्या 76 वर्षाच्या आईला औषधांचा ओव्हर डोस देऊन तिचा चेहरा प्लॅस्टिक पिशवीत घालून हत्या केली
पुणे : पुण्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पुण्याच्या धनकवडी भागात राहणाऱ्या एका मुलाने आपल्या 76 वर्षाच्या आईला औषधांचा ओव्हर डोस देऊन तिचा चेहरा प्लॅस्टिक पिशवीत घालून हत्या केली. (Murder of a mother by a Son in pune) त्यानंतर तरुणाने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. गणेश मनोहर फरताडे (वय 42) असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे तर निर्मला मनोहर फरताडे असं हत्या झालेल्या आईचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेशला काही कामधंदा नव्हता. तो शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत असल्याची माहिती आहे. यामुळं त्याच्यावर कर्जही झाले होते. बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणामुळे तो त्रासला होता. या कारणावरुन त्याने आईला औषधाचा ओव्हर डोस दिला. ती निपचित पडल्यावर तिच्या चेहर्यावर प्लॅस्टिकची पिशवी घालून गळ्यास पांढर्या रंगाच्या दोरीने घट्ट बांधून तिची हत्या केली. त्यानंतर तो घराच्या छतावर गेला आणि तिथं असलेल्या लोखंडी हुकाला नायलॉनची दोरी बांधून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहकारनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.
गणेशनं लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे की, मला तीन महिन्यांपासून नोकरी मिळत नव्हती. घर कसं चालवायचं याचं खूप टेन्शन आलं आहे. लहानपणापासूनच जीवनात त्रास होता. त्यामुळं जगण्यात आनंद नव्हता. वडील अपंग होते त्यांचीही आम्ही खूप सेवा केली. मात्र आता कर्जामुळं स्थिती बिकट झाली असल्यानं स्वत:ला संपवायचा निर्णय घेतला, असं गणेशनं सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
इतर महत्वाच्या बातम्या