Pune Crime: पुण्याच्या बाणेरमधील बड्या मसाज पार्लरवर पोलिसांचा छापा, आतमध्ये शिरताच वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश
Pune crime: पुण्यातील एक स्पा सेंटर आणि मसाज पार्लरवर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी आतमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे उघड झाले. पोलिसांकडून चौघांना अटक आणि गुन्हा दाखल.

Pune News: पुण्यातील एका प्रसिद्ध स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय सुरु असल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पुण्यातील बाणेर परिसरात हा प्रकार घडला. बाणेरच्या बालेवाडी फाटा परिसरात ‘वेदा स्पा’ सेंटरविषयी पोलिसांना माहिती मिळाली होती. या स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालतो, असे पोलिसांना समजले होते. त्यानुसार पोलिसांनी बाणेर परिसरातील मसाज पार्लर आणि वेदा स्पा सेंटरवर छापा टाकला.
पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून याठिकाणी देहविक्रय सुरु असल्याची खातरजमा केली. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून मसाज पार्लर चालक ज्योतीदेवी देवनारायण घोष (३८, रा. गहुंजे), अमनगिरी गोस्वामी (२३, रा. मुकाई चौक, रावेत) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोष आणि गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे.
तर दुसऱ्या मसाज पार्लरचा व्यवस्थापक मोहीमुद्दीन अहमद अली (वय 22) आणि मसाज पार्लर चालवणारी महिला आणि जागा मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी अनैतिक मानवी व्यापार वाहतूक प्रतिबंधक कायद्यान्वये (पिटा) गुन्हा दाखल करण्यात आला असून, मसाज पार्लरचा व्यवस्थापक मोहीमुद्दीन अली याला अटक करण्यात आल्याची माहिती आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.
Pune Drugs News: पुणे विमानतळावर 10 कोटी रुपयांचा गांजा जप्त
पुणे विमानतळावर 10 कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी बँकॉकमधून आलेल्या दोघांना घेतलं ताब्यात घेतले आहे. महसूल गुप्तचर विभागाकडून (रेव्हेन्यू इंटेलिजन्स डिपार्टमेंट) ही कारवाई करण्यात आली. चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार ‘डीआरआय’च्या पथकाकडून मुंबईतून आणखी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
बँकॉककहून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी दोन जण आले होते. त्यांच्याकडे हायड्रोपोनिक गांजा असल्याची माहिती ‘डीआरआय’च्या मुंबई पथकाला मिळाली. त्यानंतर पथकातील अधिकाऱ्यांनी विमानतळावर दोघांची चौकशी केली. त्यांच्याकडील सामानाची तपासणी केली. तेव्हा प्लास्टिकच्या पिशवीत हायड्रोपोनिक गांजा आढळून आला. चौकशीत मुंबईतील एकाकडे हायड्रोपोनिक गांजा विक्रीसाठी देण्यात येणार असल्याची माहिती दोघांनी दिली. ‘डीआरआय’च्या पथकाने मुंबईतून एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून देखील गांजा जप्त करण्यात आला. या कारवाईत दहा किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत दहा कोटी रुपये असल्याची माहिती आहे.
आणखी वाचा
























