Pune Police : दोन कोटींची लाच मागितली, तक्रारदाराने 45 लाखांच्या खेळण्यातल्या खोट्या नोटा दिल्या; पुण्यातील PSI ला 6 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी
ACB Action Against PSI : प्रमोद चिंतामणी असं अटक करण्यात आलेल्या आरोपी पोलीस उपनिरीक्षकाच नाव असून त्याने जामीन प्रक्रियेमध्ये मदत करण्यासाठी दोन कोटी रुपयांची लाच मागितली होती.

पुणे : तब्बल दोन कोटी रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी रंगेहात सापडलेल्या पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी (Pramod Chintamani PSI) याला 6 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या या पीएसआयला लाचेच्या दोन कोटीपैकी 46 लाख 50 हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (ACB) रंगेहात पकडले होते.
Pimpri Chinchwad News : जामीन प्रक्रियेत मदतीसाठी दोन कोटींची मागणी
तक्रारदार हे व्यवसायाने वकील असून त्यांच्या आशिलाविरुद्ध बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यात आशिलाच्या वडिलांनाही अटक झाली असून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. संबंधित गुन्ह्याचा तपास पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेचा पोलीस उपनिरीक्षकाकडे होता.
तक्रारदाराच्या आशिलाला मदत करण्यासाठी तसेच अटकेत असलेल्या वडिलांच्या जामीन प्रक्रियेत सहकार्य करण्याच्या मोबदल्यात त्या उपनिरीक्षकाने दोन कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.
एसीबीने याची पडताळणी केली असता आरोपी उपनिरीक्षकाने दोन कोटींपैकी एक कोटी रुपये स्वतःसाठी आणि उर्वरित एक कोटी वरिष्ठांसाठी मागितल्याचे निष्पन्न झाले .त्यानंतर तक्रारदाराने 50 लाख रुपयांचा पहिला हप्ता देण्याचे ठरवले होते.
ACB Action Against PSI Pramod Chintamani: एसीबीने खेळण्यातल्या नोटा दिल्या
यानंतर लाचलुचपत विभागाने सापळा रचून आरोपी उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी याला तक्रारदाराकडून 46 लाख 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताच रंगेहात पकडले. त्याच्याजवळून लाच रक्कम (त्यापैकी 1.5 लाख रुपयाच्या खऱ्या आणि उर्वरित 45 लाख रुपयांच्या खेळण्यांच्या नोटा), 2 मोबाइल फोन आणि रोख रक्कम मिळून एकूण 46.53 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपीने केलेल्या दाव्यानुसार, दोन कोटींची रक्कम एकट्यासाठी मागितली की वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही यात सहभाग आहे, हे तपासात निष्पन्न होणार आहे. या तपासासाठी आरोपीला 6 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश दिले आहेत.
ही बातमी वाचा:























