Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
Cyber Crime in Maharashtra: गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका प्रकरणात मुंबईतील एका प्रसिद्ध औषधविक्रेत्याची 1.30 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे.
मुंबई: मानवी तस्करीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल प्रकरणात सहभाग असल्याची भीती दाखवून परळ येथील प्रसिद्ध औषध विक्रेत्याची सव्वा कोटी रुपयांची सायबर फसवणूक (Cyber Scam in Mumbai) करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संबंधित औषध विक्रेत्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
४९ वर्षीय तक्रारदार परळ पूर्व येथील रहिवासी असून ते प्रसिद्ध औषध विक्रेते आहेत. मलेशियामध्ये त्यांच्या नावाने पाठवण्यात आलेले एक पार्सल थांबवण्यात आले असून त्यात अमली पदार्थ, 15 बनावट पारपत्र, 58 एटीएम असल्याचा दूरध्वनी त्यांना कुरियर कंपनीच्या नावाने आला होता. त्यानंतर सीमाशुल्क विभागातील एका अधिकाऱ्यानेही त्यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. सर्वोच्च न्यायालयात मानवी तस्करीप्रकरणी दाखल प्रकरणात तुमचा सहभाग असल्याचे तक्रारदार यांना सांगण्यात आले. हे सगळे आरोप ऐकून संबंधित औषधविक्रेता चांगलाच घाबरला.
त्यानंतर औषधविक्रेत्याला यांना केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) प्रमुख अनिल यादव यांनी संपर्क साधला. मलेशियामध्ये 200 भारतीयांना पाठवण्यात आले होते. त्यांच्याकडून 40 कोटी रुपयांची खंडणी स्वीकारण्यात आली. ही रक्कम खासगी बँकेच्या अंधेरीतील शाखेतील एका बँक खात्यात जमा झाली. ते खाते तक्रारदार यांच्या आधारकार्डाद्वारे उघडण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तक्रारदार यांना ऑनलाईन लिंक पाठवण्यात आली. त्यात त्यांच्या नावाचा वॉरंट व मालमत्ता जप्तीचे आदेश होते.
त्यावेळी सीबीआय अधिकाऱ्याने तक्रारदाराला अटकेची भीती दाखवून अटक टाळण्यासाठी गैरव्यवहाराच्या रकमेतील सुरक्षा ठेव म्हणून बँक खात्यात एक कोटी ३० लाख रुपये जमा करण्यास भाग पाडले. मात्र, कालांतराने सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळाची लिंक बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संबधित बँकेच्या मदतीने तपास करत आहेत.
मुकेश अंबानींचा डीपफेक व्हिडीओ दाखवून मुंबईतील डॉक्टरची फसवणूक
काही दिवसांपूर्वी रिलायन्स उद्योगसमूहाचे मालक मुकेश अंबांनी यांचा डीपफेक व्हीडिओ दाखवून मुंबईतील एका डॉक्टरची 7 लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. डॉ. के.एच. पाटील हे आयुर्वेद अभ्यासक आहेत. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक रील पाहिली होती. या रीलमध्ये मुकेश अंबानी एका कंपनीचे प्रमोशन करत होते. हा व्हीडिओ पाहून के.एच. पाटील यांनी BCF अकादमीमध्ये तब्बल 7 लाख रुपये पैसे गुंतवले. काही वेळातच त्यांना 30 लाख रुपयांपेक्षा जास्त नफा होऊ शकतो, असे सांगण्यात आले होते. मात्र, काहीवेळानंतर के.एच. पाटील यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
आणखी वाचा
तब्बल 18 लाखांहून अधिक सिम बंद होणार, सायबर गुन्ह्यांवरील नियंत्रणासाठी सरकारचं मोठं पाऊल