(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Palghar Crime : महिलेने पतीच्या प्रेयसीच्या पतीला सोबत घेऊन पतीचा काटा काढला, महिलेचेही आरोपीसोबत प्रेमसंबंध असल्याचं उघड
Palghar Crime : महिलेने पतीच्या प्रेयसीच्या पतीच्या मदतीने स्वत:च्या पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यात घडली आहे.
Palghar Crime : महिलेने पतीच्या प्रेयसीच्या (Girlfriend) पतीच्या मदतीने स्वत:च्या पतीची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना पालघर (Palghar) जिल्ह्यात घडली आहे. पतीचं प्रेमप्रकरण समजल्यानंतर संतापलेल्या महिलेने थेट प्रेयसीच्या पतीला सोबत घेऊन स्वत:च्या पतीला संपवलं. पालघर जिल्ह्यातील वाडा (Wada) तालुक्यातील बांधनपाडा इथे ही घटना घडली. संतोष रामा टोकरे असं मृत पतीचं नाव आहे. तर या प्रकरणात वाडा पोलिसांनी आरोपी पत्नीसह पाच जणांना अटक केली.
नेमकं प्रकरण काय आहे?
संतोष रामा टोकरे (वय 35 वर्षे) हा राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल होऊन वाडा पोलीस तपास करत होते. पोलीस तपासात समोर आलं की, "संतोष टोकरेचे एका विवाहित महिलेसोबत विवाहबाह्य संबंध होते. ही महिला त्याच्या नात्यातलीच होती. त्याने महिलेला पळवून आणलं होतं. याचा राग प्रेयसीच्या पतीच्या मनात होता. त्यातच मृत संतोष टोकरेचे प्रेमसंबंध पत्नीलाही माहित होते. यातूनच तिने पतीचा काटा काढण्याचं ठरवलं. यासाठी तिने पतीच्या प्रेयसीच्या पतीचीच मदत घेतली. हत्येच्या आठवडाभर आधी त्यांची मीटिंग देखील झाली. या मीटिंगमध्ये कसा आणि कधी खून करायचं याची योजना आखण्यात आली. संतोष टोकरे रात्री झोपेत असतानाच त्याची गळा दाबून आणि डोक्यात धारधार शस्त्राने वार करुन निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणात खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर वाडा पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत आरोपींना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी संतोष टोकरेच्या पत्नीसह पाच जणांना अटक केली.
पोलीस तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर
पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली आणि संतोष टोकरेची हत्या का केली याच उलगडा झाला. परंतु चौकशीतून आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. ती म्हणजे मृत संतोष टोकरेच्या पत्नीचेही आरोपीसोबत प्रेमसंबंध असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. या प्रकरणात पाच आरोपींविरोधात वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये एक महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. या सगळ्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून वाडा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत, अशी माहिती वाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी दिली.
हेही वाचा
Palghar Crime : पालघरमध्ये महिला पोलिसाने प्रियकरासह सुपारी देऊन पतीला संपवलं, पाच जणांना बेड्या