Pune Crime News :अल्पवयीन मुलीवर शारीरिक संबंध ठेवून गर्भवती केलेल्या गुन्ह्यातील आरोपीची आत्महत्या
Pune Crime News : अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील एका आरोपीने आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे.
Pune Crime News : पुणे जिल्ह्यातील इंदापूर (Indapur Crime News) तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती केलेल्या गुन्ह्यातील आरोपीने आत्महत्या केली आहे. अर्जुन उर्फ अजित रामभाऊ कुंभार असं या मुलाचं नाव आहे. अर्जुन याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे येथे हा प्रकार घडला आहे.
अर्जुन उर्फ अजित रामभाऊ कुंभार याने 14 वर्षीय मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले असल्याचा आरोप होता. दोघांनी मिळून तिच्यावर अत्याचार केले, यातून ही मुलगी दोन महिन्याची गर्भवती राहिली होती. इंदापूर तालुक्यातील भिगवन पोलिसांनी चार दिवसांपूर्वी 2 जणांविरोधात गुन्हा नोंद केला होता त्यातील एका आरोपीने काल (शनिवारी 29 एप्रिल 2023) गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आरोपीने सुसाईड नोटदेखील लिहिली आहे.
या प्रकरणी भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2023 ते 31 जानेवारी 2023 या कालावधीत शेटफळगडे परिसरातील एका वीटभट्टीच्या ठिकाणी वेळोवेळी हा अत्याचार झाला होता. याप्रकरणी अर्जुन उर्फ अजित रामभाऊ कुंभार (वय 45 वर्ष रा. शेटफळगडे ता. इंदापूर) आणि रमेश रघुनाथ मोरे (वय 35 वर्ष रा. शेटफळगडे ता. इंदापूर) या दोघांवर पोलिसांनी पोस्को कायद्यातील कलमांसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होती. आरोपींपैकी एक जण या गावाचा माजी उपसरपंच असल्याचे सांगितले जात आहे.
अल्पवयीन मुलगी 14 वर्ष वयाची आहे. तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केले. त्यावेळी तिला धमकीदेखील दिली. जर शारीरिक संबंध प्रस्थापित करू दिले नाहीत, तर तुझ्या वडिलांकडे तुझी बदनामी करू, अशी धमकी देत वेळोवेळी या दोघांनी तिच्यावर अत्याचार केले. यातून ही मुलगी दोन महिन्याची गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला होता. या संतापजनक घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून यातील एकास अटक केली होती.
अल्पवयीन मुलींवरील अत्याचारात वाढ...
पुणे जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचं प्रमाण वाढत आहे. एकाच दिवसात अशी दुसरी घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील कोरोगाव भीमामधील सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. त्यात संतापजनक बाब म्हणजे मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. या घटनेवर संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पिडीत विद्यार्थिनीच्या आईने शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात युवकावर बाल लैंगिक अत्याचारसह बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.