Navi Mumbai : गणिताचे उत्तर चुकले, खाजगी ट्युशन टीचरची बांबू आणि लाकडी फळीने विद्यार्थीनीला बेदम मारहाण
Navi Mumbai News : या विद्यार्थीनीचे शिक्षिकेने गृहपाठ म्हणून दिलेले गणित चुकले. चुकलेल्या उत्तराने संतापलेल्या विद्यार्थीनीला बांबू आणि लाकडी फळीने बेदम मारहाण केली.
Navi Mumbai : घरी गृहपाठ म्हणून दिलेल्या गणिताचे उत्तर चुकल्याने नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला खाजगी ट्युशन टीचरने बेदम मारहाण केली आहे. ही धक्कादायक घटना नवी मुंबईतील (Navi Mumbai) घणसोलीमध्ये (Ghansoli) घडली आहे. या प्रकरणी पोलिसांमध्ये (Navi Mumbai Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने पुन्हा एकदा खासगी ट्युशन चालकांकडून विद्यार्थ्यांना होत असलेल्या चुकांबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
घणसोली गावात राहणारी विद्यार्थिनी घणसोली सेक्टर 5 येथे सना या खाजगी शिकवणीला जात होती. या विद्यार्थीनीचे शिक्षिकेने गृहपाठ म्हणून दिलेले गणित चुकले. चुकलेल्या उत्तराने संतापलेल्या विद्यार्थीनीला बांबू आणि लाकडी फळीने बेदम मारहाण केली. मारहाणीमुळे शरीरातील विद्यार्थीनीच्या अनेक भागावर सूज आली.
हा प्रकार विद्यार्थीनीने पालकांना सांगितल्यानंतर पालकांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठले आणि शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी शिक्षिका शकीला अन्सारी विरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोपरखैरणे पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. दरम्यान या प्रकरणी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यास मुलीच्या पालकांनी नकार दिला आहे.
आपल्या पाल्याला शिक्षण घेण्यात काही अडचणी येऊ नये यासाठी अनेक पालक आपल्या मुलांना खासगी शिकवणीत पाठवतात. खासगी शिकवणीसाठी अनेकदा चांगले पैसे मोजले जातात. एखाद्या विद्यार्थ्याला काही अडचणी असल्यास त्याला समजावून सांगणे आणि त्याच्या अडचणी दूर करणे असा विचार खासगी क्लाससेला पाठवताना पालक करतात. मात्र, खासगी शिकवणीतील शिक्षकांकडून होत असलेल्या कठोर शिक्षेमुळे पुन्हा एकदा खासगी शिकवणींच्या नियमनाचा मुद्दा चर्चेत आला आहे.
नवी मुंबईत एक वर्षात 371 मुलं घर सोडून पळाली
वर्षभरात नवी मुंबई, पनवेलमधून (Panvel) 371 मुलांनी आपलं घर सोडून गेल्याची नोंद पोलिसांमध्ये आहे. यातील 326 मुलांना शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. मुलं हरवण्याचे प्रमाण वाढत असले तरी अपहरणाची एकही घटना घडली नसल्याची बाब समोर आली आहे. मुले हरवण्यामागे अपहरणाच्या घटना नसल्याने पालकांनी चिंता करू नये, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
मुले हरवत असल्याच्या घटना समोर येत असल्या तरी तरी अपहरणाचा एकही प्रकार नसल्याने पालक वर्गाने चिंता करायची गरज नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. जी मुलं हरवली झाली होती. त्या मागे घरगुती कारणे असल्याचे निष्पन्न झाले आहेत. त्यानंतरचे सर्वाधिक कारण हे प्रेमसंबंध असल्याचे सांगण्यात येत आहे.
त्याशिवाय, पालकाने रागावणे, मोबाईल न देणे, शाळेत फुटबॅाल प्रशिक्षणाची फी न भरणे आदी क्षुल्लक कारणांमुळे मुलं घर सोडून जात आहेत. यामुळे आता नवी मुंबई पोलिसांकडून मुलांचं आणि पालकांचे समुपदेशन करण्याचे ठरवले आहे. यासाठी शहरातील शाळा, कॉलेजमध्ये समुपदेशन शिबीर राबविण्यात येणार असल्याचे नवी मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन राठोड यांनी सांगितले.