Navi Mumbai Crime : मित्राच्या हत्येसाठी सुपारी दिली, 50 लाखांची डील फायनल केली; दोन प्रॉपर्टी डीलर्सच्या हत्येचं रहस्य नेमकं कसं उलगडलं?
Navi Mumbai Crime : नवी मुंबईतील एका धक्कादायक घटनेनं खळबळ माजवली आहे. दोन्ही प्रॉपर्टी डिलर्सची फिल्मी स्टाईलनं हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे.
Navi Mumbai Crime : नवी मुंबई : महाराष्ट्र पुन्हा एकदा धक्कादायक घटनेनं हादरला आहे. नवी मुंबईत दोन प्रॉपर्टी डीलर्सच्या हत्येचं प्रकरण समोर आलं आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे. दोन्ही प्रॉपर्टी डिलर्सची फिल्मी स्टाईलनं हत्या करण्यात आली होती. जमीन खरेदी-विक्रीच्या वादातून ही घटना घडल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे. त्यामुळे नवी मुंबईतील प्रॉपर्टी डीलर आमीर खानजादा आणि सुमित जैन यांची हत्या झाली होती. जैन यांनी एका जमिनीच्या व्यवहारावरून खानजादाला मारण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट किलर नेमला होता. त्याचवेळी खानजादा यांच्या हत्येनंतर जैन यांचाही मारेकऱ्यांनी खून केला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खानजादा आणि जैन हे दोघेही नेरुळचे असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दोघेही 21 ऑगस्ट रोजी कारमधून एका बिझनेस मीटिंगसाठी निघाले आणि त्यानंतर ते बेपत्ता झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला जाऊन बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी या प्रकरणाबाबत माहिती दिली आहे. आज तकला दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी त्यांच्या कारमध्ये बसवलेले जीपीएस वापरुन खोपोलीपर्यंत वाहनाचा माग काढला, त्यावेळी त्यांना रक्ताचे डाग, गोळ्यांचा खुणा आणि दोन रिकामी काडतुसं सापडली.
खानजादा आणि जैन यांच्यात भांडण
पोलिसांनी वेगवेगळ्या भागातील आठ विशेष पथकांचा तपासात समावेश केला. त्यामुळे 23 ऑगस्ट रोजी पोलिसांच्या पथकांनी जैन यांचा मृतदेह ताब्यात घेतला. यानंतर पोलिसांनी पाच जणांना अटक केली. विठ्ठल बबन नाकाडे (43), जयसिंग उर्फ राजा मधु मुदलियार (38), आनंद उर्फ आंद्रे राजन कुज (39), वीरेंद्र उर्फ गो-या भरत कदम (24) आणि अंकुश उर्फ अंक्या प्रकाश सीतापुरे (35) अशी अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावं आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी यासंदर्भात बोलताना सांगितलं की, आरोपींची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी खानजादाचा मृतदेह 28 ऑगस्ट रोजी ताब्यात घेतला आहे.
पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान विवादित जमिनीच्या व्यवहारावरुन खानजादाला आयुष्यातून संपवण्यासाठी जैन यांनी एकाला कॉन्ट्रॅक्ट दिल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली होती. जैन यांनी खोटा जमीन मालक उभा केला आणि रायगडमधील पाली येथील 3.5 एकरचा भूखंड अंदाजे 2 कोटी रुपयांना खरेदी केला होता. त्यांनी खरेदी केलेल्या भूखंडाचा मूळ मालक मृत पावला होता.
जैननं खानजादाला का मारलं?
खोट्या व्यवहारांबबात खानजादाला कळताच त्यानं जैन याच्याकडे जमिनीच्या सौद्यात हिस्सा मागितला. त्यानंतर जैन यांनी त्याला संपवण्याचा निर्णय घेतला. जैननं त्याचा साथीदार नाकाडे याला 50 लाखांची सुपारी दिली होती. खरं तर आखण्यात आलेला कट खानजादाला मारहाण करुन त्याचं अपहरण करण्याबाबत होता. परंतु, चुकून गोळी खानजादाच्या पायाला लागली. त्यानंतर सुपारीखोरानं खानजादाची हत्या केली. त्यानंतर सुपारीखोरांनी 50 लाखांची मागणी केली. त्यानंतर सुपारीखोर आरोपींना काहीतरी गडबड असल्याचा संशय आला आणि त्यांनी जैनच्या पायावर चाकूने वार केला. यानंतर त्याने अपहरणाच्या प्रयत्न खोटा ठरवण्यासाठी स्वत:वर गोळी झाडली. यानंतर अतिरक्तस्त्राव झाल्याने जैनचा मृत्यू झाला. यानंतर आरोपींनी त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. पोलिसांना जैनचा मृतदेह पेण-खोपोली रोडवर रस्त्याच्या कडेला पडलेला सापडला. तर खानजादाचा मृतदेह कर्नाळाजवळ सापडला. साकोरेने सांगितलं की, पाचही आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. सर्व आरोपी हिस्ट्रीशीटर असून त्यांच्या विरोधात हत्या आणि फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.