Nashik Crime : एसी दुरुस्तीच्या बहाण्याने दिवसाढवळ्या दरोड्याच्या प्रयत्न, चार जण घरात घुसले, सासरे-सुनेला बाथरूममध्ये कोंडलं अन्...; नाशिकमध्ये खळबळ
Nashik Crime : एसी दुरुस्त करण्याचा बहाणा करत चार दरोडेखोर बंदुकीच्या धाकावर घरात घुसले. यानंतर घरातील दोघांना मारहाण करत सर्व सामानाची उलथापालथ केली.

Nashik Crime : नाशिकच्या जेलरोड परिसरातल्या भारत भूषण सोसायटीत आज (31 जुलै) दिवसाढवळ्या धाडसी दरोड्याची घटना घडली आहे. एसी दुरुस्त करण्याचा बहाणा करत चार दरोडेखोरांनी बंदुकीच्या धाकावर घरात घुसून दोन जणांना मारहाण केली आणि घरातील सर्व सामानाची उलथापालथ केली. या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
प्राथमिक माहितीनुसार, रामदास गोविंद पगारे आणि त्यांची सून नीलम संदीप पगारे हे दोघेच घरात असताना, हेल्मेट घालून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी ‘एसी दुरुस्त करायचा आहे’ असं सांगून घरात प्रवेश केला. त्यानंतर लगेचच आणखी दोन जण बंदुकीसह घरात घुसले.
सासरे अन् सुनेला मारहाण करत बाथरूममध्ये कोंडलं
घरात इतर कुणीही नसल्याचा फायदा घेत दरोडेखोरांनी सोने, रोकड आणि मौल्यवान वस्तू कुठे आहेत याची माहिती मागितली. मात्र, “सर्व काही बँकेत आहे, घरात काही नाही” असे सांगताच त्यांनी रामदास पगारे व नीलम पगारे यांना तोंडाला पट्ट्या बांधून मारहाण केली आणि त्यांना बाथरूममध्ये कोंडून ठेवले. दरोडेखोरांनी घरात संपूर्ण शोधाशोध केली, परंतु त्यांच्या हाती केवळ कपडे लागले. काहीच मिळालं नाही हे लक्षात आल्यावर ते फरार झाले. जाता जाता एका चोरट्याचे हेल्मेट गेटवर लावलेले आढळून आले आहे, जे पोलिसांसाठी महत्त्वाचा क्लू ठरू शकतो.
आरोपींना जेरबंद करण्याचे पोलिसांसमोर आव्हान
घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आणि गुन्हे शोध पथकाच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. मात्र या दिवसाढवळ्या दरोड्यामुळे परिसरात खळबळ माजली असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आता या प्रकरणातील आरोपींना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान नाशिक पोलिसांसमोर आहे.
Nashik Crime : अंबड एमआयडीसीत कंपनीतून 30 लाखांच्या साहित्याची चोरी
दरम्यान, नाशिकच्या अंबड एमआयडीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कंपनीचे वॉल कंपाऊंड तोडून कंपनीतील सुमारे 30 लाख रुपये किमतीचे स्टील पाईप व इतर साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना अंबड एमआयडीसीत घडली. याबाबत श्रीकांत श्रीकुमार कारनावर (रा. द्वारका रेसिडेन्सी, पाथर्डी फाटा) यांनी फिर्याद दिली आहे. कारनावर हे अंबड एमआयडीसीतील रूट्स फॉर्मालेशन प्रा. लि. कंपनीचे काम पाहतात. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 26 ते 17 जुलैदरम्यान अज्ञात इसमाने कंपनीचे वॉल कंपाऊंड तोडून कंपनीच्या आवारात प्रवेश केला. तेथे असलेले 67 हजार रुपये किमतीचे दीड मीटर लांबीचे स्टील पाईप, 50 हजार रुपये किमतीचे 350 नग स्टील एल्बो, 45 हजार रुपये किमतीचा 200 इंचांचा स्टील पाईप, 67 हजार 500 रुपये किमतीचे 350 इंच स्टेनलेस स्टील पाईप, 35 हजार रुपये किमतीचे स्टेनलेस स्टील कटपीस, दहा हजार रुपये किमतीचा स्टेनलेस फनेल, सहा हजार रुपये किमतीचा आणखी एक फनेल, दहा हजार रुपये किमतीचा एक लोखंडी पाईप व पाच हजार रुपये किमतीचा एक लोखंडी एल्बो असे एकूण 30 लाख 5 हजार 500 रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इराद्याने चोरून नेले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.
आणखी वाचा























